मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकाजवळ जाहिरात फलकाची दोरी रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर (ओएचई) पडल्याने बुधवारी सकाळी ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक सुमारे २५ मिनिटे ठप्प झाली. ही घटना वाशी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ जवळ सकाळी ८.३५ च्या सुमारास घडली. दोरी ओएचईवर पडल्याने वाशीहून ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल सेवा थांबवावी लागली. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. काही प्रवाशांनी लोकलमधून उतरून पायपीट करीत जवळचे स्थानक गाठले. अचानक रेल्वे वाहतूक थांबल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
वाशी रेल्वे स्थानक परिसरातील जाहिरात फलकाला बांधलेली दोरी सुटून थेट ओव्हरहेड वायरवर पडली. सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाने वाशीहून ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक तातडीने थांबवली. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ओएचईवरील दोरी हटविण्याचे काम हाती घेतले. सुमारे २५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर सकाळी ९ च्या सुमारास दोरी हटविण्यात आली. त्यानंतर आवश्यक तपासणी करून लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
लोकल सेवा अचानक खोळंबल्याने प्रवाशांना लोकलमध्येच थांबावे लागले. वाहतूक पुन्हा कधी सुरू होणार, याबाबत अनिश्चितता असल्याने काही प्रवाशांनी लोकलमधून उतरून जवळचे स्थानक गाठले. सकाळी गर्दीच्या वेळी झालेल्या या खोळंब्यामुळे कार्यालयात आणि कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्याच्या नियोजनाचा खोळंबा झाला. वाहतूक सुरू झाल्यानंतरही रखडलेल्या लोकलमुळे पुढील वेळापत्रकावर परिणाम झाला. दरम्यान, जाहिरात फलक उभारताना आणि त्यांची देखभाल करताना आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याचे या घटनेतून समोर आले. जाहिरात फलकाची दोरी थेट रेल्वेच्या विद्युत वाहिनीवर पडण्याल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.
ओएचईवरील अडथळ्यांच्या घटनांची पुनरावृत्ती
रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर बाहेरील वस्तू पडून लोकल वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कधी केबल, कधी कपडा, तर कधी जाहिरात फलकाची दोरी ओएचईवर पडत असल्याने रेल्वेची विद्युत यंत्रणा आणि लोकल वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा घटनांमुळे केवळ वाहतुकीचा खोळंबा होत नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो. रेल्वे मार्गालगतच्या जाहिरात फलकांची पाहणी, अनधिकृत साहित्य हटविणे आणि संबंधित यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
