मुंबई : बस थांब्यांवर छत नसणे, अतिक्रमणांचा विळखा अशी असलेली मुंबईतील बेस्ट बस थांब्याची ओळख लवकरच पुसली जाईल. मुंबईतील ३५० बस थांब्यांचा येत्या तीन महिन्यात कायापालट केला जाणार आहे. हरित तसेच सौरऊर्जा निर्माण करणारे थांबे, अशी ओळख या बस थांब्यांची होईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.

उद्योगपती आणि मिहद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद मिहद्रा यांनी नुकतीच ट्विटरद्वारे महालक्ष्मी येथील एका बस थांब्याचे कौतुक केले होते. व्यायाम बार, हिरवे छत यासारख्या नाविन्यपूर्ण वैशिष्टांसह बस थांबे पाहणे खूपच छान आहे, असे त्यांच्या ट्विटरवर नमूद होते. समाजमाध्यमांवरही या थांब्याचे फोटो पाहिले गेले. मुंबई महापालिका आणि बेस्ट उपक्रमाकडून असे बस थांबे उभारण्यासाठी काम सुरू झाली आहेत. मुंबईतील जवळपास ३५० बस थांबे हरित थांबे, सौरऊर्जा निर्माण करणारे आणि साध्या अशा तीन प्रकारातीलही असतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. या कामासाठी निविदाही काढण्यात आली आहे. साधारण तीन महिन्यात नवीन प्रकारातील बस थांबे प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे लोकेश चंद्र म्हणाले. सौरऊर्जा प्रकारातील बस थांबे हा पहिलाच प्रयोग असेल. यामधून बस थांब्याचीही विजेची गरज भागवता येणार आहे.

नवी झळाळी: मुंबईतील बेस्टच्या आणखी ३ हजार ३२२ बस थांब्यांनाही नवीन झळाळी देण्यात येणार आहे. यातील १०० बस थांब्यांचे कामही पूर्ण झाले आहे. या बस थांब्याना नवीन झळाळी देताना एलईडी दिवे, काचेचे छत, चांगली आसनव्यवस्थाही असेल. हे बदल करतानाच बस गाडय़ांची सद्यस्थिती देणारे एलईडी स्क्रिनही बसवण्यात येणार आहे.