मुंबई : अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार असून त्यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १२ आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागातील ८ स्थानकांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी केली जाणार आहे.
अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत देशभरातील एकूण १,३०९ रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. या स्थानकांचे आधुनिक सुविधांसह जागतिक दर्जाच्या टर्मिनसमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. आगामी अर्थसंकल्पात राज्यासाठी १५,५५४ कोटींची विक्रमी तरतूद करण्यात आली असून अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत ५६ स्थानकांचा जागतिक दर्जाप्रमाणे विकास केला जाणार आहे.
हेही वाचा >>>तब्बल ७८ दिवसांनंतर पदव्युत्तर विधिच्या द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल जाहीर, २४.२४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
अमृत भारत स्थानक योजना…
पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ फेब्रुवारी रोजी १,५०० उड्डाणपुलाचे लोकार्पण आणि अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ५५४ स्थानकांच्या विकास कामांची पायाभरणी करणार आहेत. अमृत भारत स्थानक योजनेच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय स्थानकांना झळाळी मिळणार आहे. तसेच पायाभूत सुविधा वाढल्याने, प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
या स्थानकांचे रूप पालटणार
या ५६ स्थानकांपैकी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १२ स्थानकांचा समावेश आहे. यात भायखळा, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा आणि इगतपुरी यांचा समावेश आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परेल, प्रभादेवी, जोगेश्वरी, मालाड आणि पालघर स्थानकांचे रूप पालटणार आहे.