नागपूर: राज्य शासनाने दुचाकी टॅक्सी धोरणाला मंजूरी देत त्याबाबत हरकती व सूचना मागवल्या होत्या. परंतु अद्यापही त्याला मंजूरी नाही. त्यातच राज्यात अनधिकृत दुचाकी टॅक्सीचा सुळसुळाट असल्याच्या तक्रारी वाढत आहे. त्यावरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही बुधवारी एका कंपनीच्या ॲपवरून दुचाकी टॅक्सी बुक केली. त्यानंतर काही मिनटातच असे झाले की परिवहन मंत्र्यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला.महाराष्ट्र शासनाकडून अद्यापही राज्यात कोणत्याही शहरातील दुचाकी टॅक्सीला परवानगी दिली नाही. त्यानंतरही रॅपिडो कंपनीकडून अवैधरित्या अँप द्वारे आरक्षण करून प्रवाशांना दुचाकी टॅक्सीची अनधिकृत सेवा दिली जात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या कंपनीच्या अनधिकृत दुचाकी टॅक्सीची सिनेस्टाईल भांडाफोड केला. परिवहन मंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार, शासनाने नुकतेच ई- बाईक धोरण जाहीर केले आहे.
धोरणानुसार विविध अटी -शर्तीचे पालन करणाऱ्या व केवळ इलेक्ट्रिक बाइक असलेल्या संस्थांना यापुढे बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाईक टॅक्सी या अनधिकृत आहेत. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला याबाबत विचारले असता, मुंबई अथवा इतर शहरांमध्ये कोणतीही अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप अस्तित्वात नाही. असे ‘सरकारी’ उत्तर खुद्द मंत्र्यांना परिवहन खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाले होते. परंतु मंत्र्यांना स्टिंग ऑफरेशनद्वारे वेगळाच अनुभव आला. त्यामुळे परिवहन मंत्र्यांनाही हा अनधिकृत दुचाकी टॅक्सीचा प्रकार बघून धक्काच बसला.
परिवहन मंत्र्यांनी असे केले स्टिंग ऑपरेशन…
रॅपीडो कंपनीच्या अनधिकृत दुचाकी टॅक्सीच्या व्यवसायाची उलट तपासणी करण्याचे हेतूने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी योजना आखली. त्यानुसार रॅपिडो बाईक टॅक्सी ॲपवर स्वतः अनोळखी नावाने बाईक बुक केली. पुढच्या दहा मिनिटांमध्ये सदर बाईक त्यांना घेऊन जाण्यासाठी मंत्रालयातील शहीद बाबू गेनू चौकामध्ये हजर झाली. अशाप्रकारे अनाधिकृतरित्या ‘बाईक ॲप’ चालवणाऱ्या संस्थेचे भांडा -फोड स्वतः परिवहन मंत्र्यांनी केले. आता, खुद्द मंत्री महोदयांना खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर काय कारवाई होईल? याचे औतुक्य लागून राहिले आहे.
टॅक्सी चालकाला परिवहन मंत्री काय म्हणाले ?
मंत्रांनी बुक केल्यावर आलेली मोटार सायकल (दुचाकी टॅक्सी) चालकाला मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडे म्हणून ५०० रुपये देऊ केले. तसेच ‘तुझ्यासारख्या गोरगरिबावर गुन्हा दाखल करून आम्हाला काहीच साध्य होणार नाही. तथापि, या मागे लपलेल्या बड्या धेंडाना शासन झाले पाहिजे! हाच आमचा हेतू आहे.’ असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दुचाकी टॅक्सी चालक तरुणाला म्हणाले.