मुंबई : मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची, अस्मिता आणि सामाजिक एकात्मतेची ओळख असल्याने तिचे संवर्धन व सन्मान ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहतूक चालकांनी व्यवहारिक मराठी शिकून प्रवाशांबरोबर मराठीत संवाद साधावा, या उपक्रमाला व्यापक लोकसमर्थन मिळावे यासाठी त्यांनी खुले पत्र लिहून सहकार्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यावसायिक प्रवासी वाहन चालकाला व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे ही काळाची गरज आहे. प्रवाशांबरोबर संवाद साधताना मराठीचा वापर वाढल्यास भाषेचे संवर्धन होण्याबरोबरच समाजातील परस्पर संवाद अधिक सुसंवादी, आत्मीय आणि परिणामकारक बनेल, असे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.
भाषा ही केवळ शब्दांची देवाणघेवाण नसून ती संस्कृती, परंपरा, मूल्ये आणि सामाजिक ओळख जपणारी एक माध्यम आहे. त्यामुळे मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर होणे आवश्यक आहे, असे सरनाईक यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना पत्रात नमूद केले आहे.
मुंबई महानगर क्षेत्रासह राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या संख्येने अमराठी चालक प्रवासी वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहेत. हे चालक मराठी शिकून प्रवाशांबरोबर मराठीत संवाद साधू लागले, तर ते मराठी भाषेच्या सन्मानासाठी आणि सामाजिक समन्वयासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण आपल्या राज्यात नागरिक किंवा प्रवासी म्हणून वावरताना मराठी भाषेचा आग्रह धरणे स्वाभाविक आहे. मराठीचा अभिमान आणि तिचा वापर ही सवय प्रत्येकामध्ये रुजविण्याची वेळ आता आली आहे, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.
समाजमन घडविण्यात प्रसारमाध्यमांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. या उपक्रमाला वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांतून प्रसिद्धी मिळाल्यास मराठी भाषा शिकण्याची चळवळ अधिक व्यापक आणि प्रभावी बनेल. माध्यमांच्या सहकार्यामुळे मराठी संवाद संस्कृतीला नवे बळ मिळेल आणि जनजागृतीचा संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राची अस्मिता यांचा सन्मान राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन सरनाईक यांनी केले.
