मुंबई : दिवाळीनिमित्त खरेदी, नातेवाईकांच्या भेटीगाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून विलंबाने धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोकल आणि काही भागांत विस्कळीत झालेल्या बेस्टच्या बस सेवेचा फटका मंगळवारी नागरिकांना सोसावा लागला. दरम्यान, ऐन उत्सव काळात लागू केलेल्या ‘रविवार वेळापत्रका’मुळे मंगळवारी दिवसभर मध्य रेल्वेवरील उपनगरीय धिम्या आणि जलद लोकल विलंबाने धावत होत्या, तर मरोळ आणि दिंडोशी या दोन आगारांतील बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झाले. आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल होत असताना बेस्ट उपक्रम मात्र संबंधित कंत्राटदारावर केवळ कारवाई करण्याचे आश्वासन देत असल्याने मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

 सध्या दिवाळी सुरू असून खरेदी, नातेवाईकांना भेटण्यासाठी, तसेच कार्यक्रमांना जाण्यासाठी लोकल गाडय़ांना मोठी गर्दी होत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे लोकल सेवा विस्कळीत होत आहे. आता ऐन दिवाळीतही लोकलच्या वेळापत्रकाचे गणित बिनसले आहे. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या आणि जलद लोकल मंगळवारी सकाळपासून दहा ते पंधरा मिनिटे विलंबाने धावत होत्या. ‘रविवार वेळापत्रक’ लागू केल्याने नेहमीपेक्षा कमी लोकल फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत होत्या. भाऊबीज व पाडवा बुधवारी आहे. मात्र मंगळवारी लोकल गाडय़ांना प्रचंड गर्दी होती. त्यातच ‘रविवार वेळापत्रका’मुळे लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. परिणामी कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, भांडुप, कुर्ला, दादरसह काही स्थानकांतून लोकल पकडताना किंवा उतरताना धक्काबुकी होत होती. काही लोकल फेऱ्या रद्दही करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. लोकल विलंबाने का धावत आहे ते प्रवाशांना कळत नव्हते.

वेळापत्रक बिघडण्याचे कारण..

‘रविवार वेळापत्रक’ लागू केल्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत लोकलच्या फेऱ्या कमी होत्या, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. वर्धा-बडनेरा विभागादरम्यान एका मालगाडीचे डबे २३ ऑक्टोबर रोजी घसरले होते. त्यामुळे मुंबईतून जाणाऱ्या आणि येणाऱ्या मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम झाला होता. त्याचा काहीसा फटका जलद लोकल सेवांना बसत असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रवाशांचे हाल

 लोकलबरोबरच बेस्ट बस प्रवाशांचेही हाल झाले. मरोळ आणि दिंडोशी आगारातील कंत्राटी चालक, वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांनी वेळेवर वेतन न मिळणे, समान काम समान वेतन यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी पुन्हा काम बंद आंदोलन केले. त्यामुळे या दोन आगारांतून बसगाडय़ा बाहेर पडू शकल्या नाहीत. त्याचा फटका प्रवाशांना बसला. या दोन आगारांतील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा हा दुसरा दिवस होता, तर विविध आगारांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत पुकारलेल्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याने बेस्ट उपक्रमाने अन्य चालकांच्या मदतीने बेस्ट सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन दुपारनंतरही सुरूच होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशारा बेस्ट उपक्रमाने दिला आहे.