मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पाअंतर्गत (एससीएलआर) वाकोला ते वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) दरम्यान उड्डाणपूल बांधत आहे. हा पूल आतापर्यंत वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. आता मात्र प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून मार्चपर्यंत काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत हा पूल वाहतूक सेवेत दाखल केला जाणार असल्याने मार्चअखेरपासून बीकेसी – वाकोला आणि पुढे पश्चिम द्रुतगती मार्ग असा प्रवास अवघ्या काही मिनिटांत करता येणार आहे.

एमएमआरडीएने सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्ताराअंतर्गत समाविष्ट असलेला शेवटचा उड्डाणपूल म्हणजे वाकोला – बीकेसी उड्डाणपूल.

१.२ किमी लांबीच्या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, विद्यापीठ जंक्शन आणि बीकेसी जंक्शन येथे जाणे सोपे व्हावे आणि येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी एमएमआरडीएने या पुलाचे बांधकाम घेतले आहे. या पुलाचे काम सुरू होऊन अनेक वर्षे झाली असून आतापर्यंत पूल वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र कामाची संथगती आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प पूर्णत्वास विलंब झाला आहे. पण आता मात्र या प्रकल्पाचे ८५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली. उर्वरित काम येत्या काही दिवसात पूर्ण करून मार्चअखेरीस हा पूल वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोन मार्गिकेच्या आणि ६४५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे वाकोला, पश्चिम द्रुतगती मार्ग ते बीकेसी प्रवास अतिजलद होणार आहे.

५ ते १० मिनिटात हे अंतर पार करता येणार असून प्रवासी – वाहनचालकांचा २५ ते ३० मिनिटांचा वेळ वाचणार असल्याचा दावा यानिमित्ताने एमएमआरडीएकडून केला जात आहे. सिग्नलमुक्त या पुलामुळे दहिसर, अंधेरीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना बीकेसीत ५ ते १० मिनिटांत येणे आता सोपे होणार आहे. आजघडीला पूर्व द्रुतगती मार्गावरून बीकेसीत येण्यासाठी वाहनचालक – प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. पण मार्चपासून मात्र त्यांचा प्रवास सुकर होणार आहे. वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, विद्यापीठ जंक्शन आणि बीकेसी जंक्शन येथे पोहचणे सोपे होणार आहे.