शैलजा तिवले

मुंबई : मुंबईत नव्याने सुरू होणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना घराजवळच रात्री उशीरापर्यत मोफत आरोग्य सेवा मिळणे शक्य होणार आहे. ही केंद्रे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पामध्ये घराशेजारी प्रतिबंधात्मक आणि प्राथमिक उपचार सुरू करण्याच्या उद्देशाने शहरात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये पहिल्या टप्प्यात १०० आणि त्यानंतर १०० अशी २०० केंद्रे उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. याची अंमलबजावणी सुरू झाली असून दोन टप्प्यांमध्ये ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

काय आहे प्रकल्प

घराजवळच प्राथमिक उपचार उपलब्ध करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. मुंबई महानगरपालिका पहिल्या टप्प्यात ७० दवाखाने सुरू करणार आहे. यातील जवळपास ३० दवाखाने मुंबई महानगरपालिकेच्या सध्या सुरू असलेल्या दवाखान्यांमध्येच आहेत. अन्य ४० दवाखान्यांसाठी प्रत्येक विभागामध्ये, विशेषत: झोपडपट्टी भागांमध्ये काही जागी निश्चित केल्या असून तेथे नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. या दवाखान्यांमध्ये एक एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका, औषधविक्रेता आणि एक बहुउद्देशीय कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. हे दवाखाने दुपारी ३ ते रात्री १० पर्यत सुरू राहणार आहेत. सध्य सुरू असलेल्या दवाखान्यांमध्येही दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे सुरू होतील. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे सध्या सुरू असलेले हे ३० दवाखाने सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत सुरू राहतील, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

दुसऱ्या टप्प्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विशेषोपचार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांमध्ये नेत्र, दंत, कान-नाक-घसा, स्त्रीरोग अशा विविध आजारांवरील विशेष उपचार उपलब्ध केले जाणार आहेत. मुंबईत यासाठी १३ दवाखाने निश्चित केले असून येथे नियोजित दिवस आणि वेळेनुसार तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतील.

तरतूद किती?

बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे आणि विशेषोपचार केंद्रे यांच्या उभारणीसाठी भांडवली खर्चाकरिता सुमारे २५० कोटी रुपये, तर महसुली खर्चाकरिता सुमारे १५० कोटी रुपये अशी एकत्रित सुमारे ४०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे कंटेनरमध्ये

शहरात सुरू करण्यात येणाऱ्या ७० पैकी ४० दवाखाने नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. झोपडपट्टीमध्ये निश्चित केलेल्या जागांमध्ये जवळपास ३० दवाखाने हे कंटेनरसारख्या तयार पायाभूत सुविधांमध्ये सुरू केले जाणार आहेत. यासाठी मुंबई महानगरपालिकेने निविदाही काढलेल्या आहेत. डॉक्टरांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. १० ते १२ ठिकाणी तयार जागा प्राप्त झाल्या असून तेथे इतर सोई उपलब्ध करून दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता झोपडपट्टीमध्ये आवश्यकता आहे तेथे मुंबई महानगरपालिकेचे हे दवाखाने पोहचतील. या दवाखान्यांमध्ये नोंदणीसाठी १० रुपयेही रुग्णांना द्यावे लागणार नाहीत. या दवाखान्यांमध्ये पूर्णपणे मोफत उपचार करण्यात येतील, असे डॉ. गोमारे यांनी सांगितले. 

मोफत तपासण्या

बाळासाहेब ठाकरे आरोग्यकेंद्रामध्ये प्राथमिक रक्ताच्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. आपली चिकित्साअंतर्गत आकारले जाणारे शुल्क या दवाखान्यांमध्ये घेण्यात येणार नाहीत. यासाठी सध्या आपली चिकित्साअंतर्गत तपासण्या केल्या जातील. परंतु लवकरच निविदा काढून यासाठी नवीन प्रयोगशाळांशी करार केला जाईल, अशी माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू

पहिल्या टप्प्यात उपलब्ध दहा दवाखान्यांमध्ये आणि पाच कंटेरनमध्ये अशी १५ बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून कार्यरत होतील. तसेच १३ बाळासाहेब ठाकरे विशेषोपचार केंद्रेही यावेळी सुरू होणार असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले.

आघाडीवर सुरू करण्याचे आदेश

मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेला बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्राचा प्रकल्प प्राधान्याने राबविण्यात येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये झालेल्या सत्तांतरानंतर हा प्रकल्प सुरू करण्याचा वेग आणखी वाढला आहे.