scorecardresearch

स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा

निरोगी मेंदूपेक्षा स्मृतिभ्रंशचा आजार झालेल्या व्यक्तीच्या मेंदूंमध्ये ‘अ‍ॅमिलाईड’ हे मोठय़ा प्रमाणात असते.

स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा
प्रतिनिधिक छायाचित्र photo source : indian express

मुंबई : वृद्धापकाळात अनेकांना स्मृतिभ्रंशाला सामोरे जावे लागते. हा आजार बरा करण्यासाठी कोणतेही औषध नसल्याने अनेकांच्या दृष्टीने वृद्धापकाळ मोठा त्रासदायक होतो.  मात्र, आता प्रभावी औषध शोधण्यात यश आले असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. ‘लेकेनेमॅब’ असे या औषधाचे नाव असून, त्यामुळे हा आजार बरा होणार आहे. 

स्मृतिभ्रंशग्रस्त नागरिकांच्या मेंदूमध्ये एक प्रकारचा चिकट द्रव म्हणजेच ‘बीटा अ‍ॅमिलॉईड’ तयार होत असते. यावर ‘लेकेनेमॅब’ हे औषध हल्ला करते. ते मेंदूतील ‘अ‍ॅमिलाईड’ काढून टाकण्याच्या दृष्टिकोनातून बनवण्यात आलेले आहे. अ‍ॅमिलाईड हे प्रथिनांचा एक प्रकार असून, ते मेंदूतील ‘न्यूरॉन्स’मधील मोकळय़ा जागेत जमा होते. हे एक स्मृतिभ्रंशचे लक्षण आहे.

निरोगी मेंदूपेक्षा स्मृतिभ्रंशचा आजार झालेल्या व्यक्तीच्या मेंदूंमध्ये ‘अ‍ॅमिलाईड’ हे मोठय़ा प्रमाणात असते. ‘लेकेनेमॅब’ हे ‘अ‍ॅमिलाईड’वर हल्ला करणाऱ्या रोगप्रतिकारक पेशी तयार करून ते नष्ट करत असल्याचे संशोधनातू दिसून आले. या संशोधनामध्ये १ हजार ७९५ स्मृतिभ्रंशग्रस्तांवर पहिल्या टप्प्यात चाचण्या करण्यात आल्या. दर १५ दिवसांनी त्यांना ‘लेकेनेमॅब’ हे औषध दिले जात होते.

स्मृतिभ्रंशसंदर्भातील ‘लेकेनेमॅब’चे  निष्कर्ष हे उल्लेखनीय असल्याचे ब्रिटनमधील संशोधकांकडून सांगण्यात आले. या संशोधनात सहभागी झालेल्यांपैकी १७ टक्के नागरिकांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला, १३ टक्के नागरिकांच्या मेंदूला सूज आल्याचे मेंदूचे ‘स्कॅन’ केल्यानंतर दिसून आले. तर, सात टक्के लोकांना झालेल्या दुष्परिणामामुळे औषध बंद करावे लागले.

‘लेकेनेमॅब’ या औषधाचा स्मृतिभ्रंश रुग्णांवर फारच थोडा परिणाम दिसून आला असला तरी त्यांच्या दैनंदिन आयुष्याच्या दृष्टिकोनातून हा परिणाम फार महत्त्वपूर्ण असल्याचे संशोधकांकडून सांगण्यात येते. सॅन फ्रान्सिस्कोमधील अल्झायमर रोग परिषदेत वैद्यकीय चाचण्यांचे सादर केलेले आणि न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. या औषधानंतरही नागरिकांच्या मेंदूची शक्ती क्षीण होण्याचे प्रमाण कायम असले तरी १८ महिन्यांच्या काळात हे प्रमाण एक चतुर्थाशने कमी झाल्याचे दिसून आले आहे.

 ३० वर्षांपासून संशोधन करणाऱ्या प्रो. जॉन हार्डी यांनी हे संशोधन ऐतिहासिक  आहे, असे सांगितले. एडीनबर्ग विद्यापीठाचे प्रो. तारा स्पायर्स जोन्स यांनी अनेक वर्षांपासून सातत्याने येत असलेल्या अपयशामुळे हे संशोधन महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.  भविष्यात अधिक चांगली औषधे निर्माण होण्यास मदत होईल, असे अल्झायमर रिसर्च डॉ. सुसान कोहलहास यांनी सांगितले. ‘लेकेनेमॅब’ हे वापरासाठी योग्य आहे का? यासंदर्भातील माहितीचे अमेरिकेतील नियामकांद्वारे मूल्यमापन करण्यात येत आहे. दरम्यान, आता फक्त हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी औषध उपलब्ध आहे.

संशोधकांमध्ये उत्साह..

स्मृतिभ्रंशमध्ये मेंदूवर होत असलेल्या आघातामुळे रुग्णाची शक्ती क्षीण होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये विसराळूपणा निर्माण होतो. मात्र यावर आजार पूर्ण बरा करणारे औषध नसल्याने डॉक्टरांसमोर आव्हान होते. आता औषध सापडल्याने संशोधकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच, रुग्णांनाही दिलासा मिळाला आहे. सध्या जगामध्ये ५५ दशलक्ष नागरिक स्मृतिभ्रंश या आजाराने त्रस्त आहेत. २०५० मध्ये ही संख्या १३९ दशलक्ष इतकी होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 06:06 IST

संबंधित बातम्या