मुंबई : मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने राबविलेल्या वृक्ष संजीवनी मोहिमेअंतर्गत तब्बल ९८३ वृक्षांभोवतीचे काँक्रीट हटविण्यात आले असून झाडांवर झळकवलेले एक हजार ३२५ जाहिरातींचे फलकही काढून टाकण्यात आले. त्याचबरोबर झाडांवर ठोकलेले तब्बल ९४ किलो खिळेही काढण्यात आले आहेत. विविध संस्था, शाळा, महाविद्यालयांच्या सहकार्याने सुरू असलेल्या मोहिमेमुळे मुंबईतील वृक्ष संपदेच्या संवर्धनास मदत होत आहे.
येत्या २२ एप्रिल रोजी वसुंधरा दिन असून त्यानिमित्ताने उद्यान विभागातर्फे अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत वृक्ष संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे.
झाडांभोवती काँक्रीटीकरण केल्यामुळे मुळांची वाढ खुंटते आणि जमिनीत पाणी न मुरल्याने वृक्ष मृत होण्याची किंवा उन्मळून पडण्याची शक्यता असते. त्याचबरोबर खिळे, पोस्टर, बॅनर, विद्युत रोषणाई आदींमुळे वृक्षांना इजा होते. खिळे मारलेल्या किंवा फलक लावलेल्या ठिकाणी झाडाचे खोड कुजून वृक्ष तुटून पडण्याची अथवा मृत होण्याची दाट शक्यता असते. या बाबी लक्षात घेऊन पालिकेने १८ ते २३ एप्रिल या कालावधीत वृक्ष संजीवनी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ९८३ वृक्षांभोवतीचे काँक्रीट काढण्यात आले असून सहा हजार १६७ वृक्षांवरील खिळे, जाहिरातींचे फलक काढण्यात आले आहेत. वृक्षांवर ठोकलेले तब्बल ९४.१९४ किलो खिळेही काढण्यात आले असून एक हजार ३२५ जाहिरात फलक हटविण्यात आले आहेत. तसेच सिमेंट काँक्रीट काढल्यानंतर झाडाभोवती लाल माती टाकण्यात येत आहे.
या मोहिमेत पार्ले वृक्ष मित्र, एकता मंच, रिव्हर मार्च एलएसीसी, आंघोळीची गोळी आदी सामाजिक संस्था, विविध शाळा, महाविद्यालये सहभागी झाले आहेत. तसेच विद्यार्थी व नागरिकांमध्ये या मोहिमेबाबत जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
