scorecardresearch

वेळापत्रकातील बदलामुळे उपनगरीय रेल्वेप्रवाशांची त्रेधा

मध्य रेल्वेवर नुकतीच ३४ नव्या वातानुकूलित लोकल फेऱ्यांची भर पडली.

वातानुकूलित लोकलच्या ३४ फेऱ्यांच्या समावेशामुळे गोंधळ

मुंबई : मध्य रेल्वेवर नुकतीच ३४ नव्या वातानुकूलित लोकल फेऱ्यांची भर पडली. यासाठी सामान्य लोकलच्या वेळापत्रकात अचानक केलेल्या बदलांमुळे प्रवाशांची त्रेधातिरपीट उडत आहे. त्यामुळे अन्य लोकल फेऱ्यांनाही गर्दी होते. या बदलावर तोडगा काढण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण नुकतेच पार पडले. त्याच वेळी ३४ नव्या वातानुकूलित लोकल फेऱ्यांचीही घोषणा करण्यात आली आणि १९ फेब्रुवारीपासून या फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत आल्या. त्याला अद्यापही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यापूर्वी सीएसएमटी ते कल्याण मार्गावर १० वातानुकूलित लोकल फेऱ्या होत्या. नव्या ३४ फेऱ्यांची भर पडणार असल्याने या मार्गावरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ४४ झाली. सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव मार्गावरही १६ वातानुकूलित फेऱ्या होत आहेत. मात्र मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, टिटवाळा मार्गावर सेवेत आलेल्या ३४ नवीन वातानुकूलित फेऱ्यांसाठी सामान्य लोकलच्या फेऱ्यांमध्येच बदल केले.  याची प्रवाशांनाही कल्पना नसल्याने लोकल पकडताना त्यांचा गोंधळ होत आहे. सीएसएमटी, ठाणे, कल्याण येथून गर्दीच्या वेळी सुटणाऱ्या सामान्य लोकलऐवजी वातानुकूलित लोकल सुटत असल्याने प्रवाशांना मिळेल त्या लोकलने गर्दीतून प्रवास करावा लागत आहे.

प्रवासी संघटनांची नाराजी

ल्ल उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी बदललेल्या वेळापत्रकावर टीका केली. विनावातानुकूलित फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करताना त्याची प्रवाशांना पूर्वकल्पना देणे गरजेचे होते. प्रवाशांना हा बदल पचनी पडला आहे का, त्याचा मनस्ताप तर होत नाहीना याचा आढावाही मध्य रेल्वे प्रशासन घेत नाही. वातानुकूलित लोकलचे तिकीट दर कमी करूनची त्यांच्या वाढीव फेऱ्या चालवणे योग्य होते, असे अरगडे यांनी सांगितले.

ल्ल रेल यात्री परिषदचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनीही वातानुकूलित लोकल फेऱ्यांमुळे सामान्य लोकल फेऱ्यांच्या वेळेत केलेले बदल प्रवाशांना त्रासदायक ठरत असल्याचे सांगितले. वेळापत्रकात बदल करण्यापूर्वी रेल्वे प्रशासन प्रवासी संघटनांशीशी चर्चा करुन त्यांच्या सूचना घेत होते. परंतु तेही यावेळी केलेले नाही. यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडेही दाद मागितली जाणार आहे, असे गुप्ता म्हणाले.

मी डोंबिवलीला राहतो आणि कुलाब्याला कामाला आहे. रात्री ९.४२ ची कल्याण विना वातानुकूलित अर्ध जलद लोकल घाटकोपरपासून धीमी होती. मात्र त्यावेळेत वातानुकूलित लोकल चालवण्यात आली. त्यामुळे थेट रात्री ९.५४ ची कल्याण जलद लोकल पकडण्याशिवाय पर्याय राहात नाही. 

– मुकुंद चरकरी, डोंबिवली रहिवासी

मी वांद्रे कुर्ला संकुल येथे कामाला आहे. कुर्ला स्थानकातून सायंकाळी ६.३० वाजता ठाण्याला जाणारी विना वातानुकूलित जलद लोकल होती. त्या वेळेत आता वातानुकूलित जलद लोकल चालवण्यात येत आहे. तर ठाण्यातून सकाळी ८.०३ वाजता सीएसएमटीला जाणाऱ्या विना वातानुकूलित जलद लोकलच्या ऐवजी ८.०२ वाजता वातानुकूलित लोकल सुरू केली. याची कल्पनाही नव्हती. गर्दीच्या वेळी चालवण्यात येत असलेल्या या लोकलमुळे अन्य लोकल फेऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. आमची गैरसोय होत आहे.

– गुरदीप कौर, ठाणे रहिवासी

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Trend suburban train passengers due to change schedule ysh

ताज्या बातम्या