मुंबई : आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा आणि वसतीगृहांमधील दुरावस्था व त्यामुळे होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूने राज्यात खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विभागाच्या आणखी एका योजनेतील सावळा गोंधळ समोर आला आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित निवासी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश देण्याच्या योजनेमध्ये अधिकाऱ्यांनी नियमबाह्य श्रेणीवाढ देऊन शाळांना शेकडो कोटींचा लाभ मिळवून दिला असून यासंदर्भात ‘कॅग’ने विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

२०१० मध्ये राज्याच्या आदिवासी विभागाने योजना सुरू केली. या योजनेमध्ये १७० शाळा असून प्रतीवर्ष दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांना पहिलीमध्ये प्रवेश दिला जातो. मागच्या वर्षी या योजनेत ३८,०५३ विद्यार्थी होते. या शाळा नामांकित खाजगी इंग्रजी शाळा आहेत. शाळांची अ, ब, क अशी श्रेणी केली जाते. ५०, ६० आणि ७० हजार रुपये या शाळांना श्रेणीनुसार प्रती विद्यार्थी, प्रती वर्ष दिले जातात. वर्षाला २५० कोटी रुपये या योजनेवर खर्च होतात. २०१८ पासून यावर १,३९८ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

शाळांच्या मान्यता, प्रवेश मंजुरी, शाळा श्रेणी यासाठी सचिव समिती आहे. मात्र विभागाने तब्बल २६ शाळांना आपल्या निर्णयाच्या विरोधात जाऊन श्रेणीवाढ दिली. १८ शाळांची प्रधान सचिवांनी, ४ शाळांची उपसचिवांनी श्रेणीवाढ केली. तर चार शाळांची श्रेणी कोणी वाढवली, याची माहिती विभागाच्या अभिलेखावर नाही. यामुळे शाळांना प्रती विद्यार्थी २० हजार रुपये अधिक मिळाले. या श्रेणीवाढीला समितीची मंजुरी घेतली नव्हती तसेच श्रेणी उन्नतीबाबत विभागाने आजपर्यंत सुनिश्चित प्रक्रिया (‘एसओपी’) बनवली नसल्याचे ‘कॅग’ला आढळून आले.

‘कॅग’चा गंभीर ठपका :

या योजनेतील अर्ध्याअधिक शाळांकडे विशेष पायाभूत सुविधा नाहीत. तरीही सुविधा करण्याच्या हमीवर अनेक शाळांना श्रेणीवाढ दिली जाते. काही शाळांना निवेदानाच्या आधारे श्रेणीवाढ दिली गेली. आहार, गणवेश, दप्तर यासाठी शाळांना प्रती विद्यार्थी ५० ते ७० हजार दिले जातात. पण ज्या शाळा अनिवासी आहेत, त्यांनासुद्धा हा निधी देण्यात आला आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांना दप्तर, गणवेशच दिले नसल्याचे ‘कॅग’ने (भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक) म्हटले आहे. हा अहवाल जुलैमधील अधिवेशनात सादर झाला.

शिक्षकांच्या इंग्रजीविषयी संशय :

योजनेचा निधी आदिवासी विद्यार्थ्यांवर खर्च केला, याविषयीचे उपयोगिता प्रमाणपत्र शाळांकडून घेतले जात नाही. घटस्फोटीत, विधवा, निराधार, यांच्या पाल्यांना प्राधान्याने प्रवेशाचा नियम आहे. मात्र शाळा विद्यार्थ्यांची निवड करतात. प्रकल्प अधिकारी शाळांची त्रैमासिक पाहणी करत नाहीत. शाळा प्रवेशाला ९० ते १७१ दिवस विलंब होतो. शिक्षकांच्या इंग्रजी भाषेची परीक्षा होत नाही, असे आक्षेप ‘कॅग’ने या योजनेवर ठेवले आहेत.

भेदभावाची वागणूक :

नामांकित योजनेतील प्रत्येक शाळेस दोन कोटी रुपये मिळतात. परंतु, या शाळांमध्ये सुविधा पुरवल्या जात नाहीत. आदिवासी विद्यार्थ्यांची स्वतंत्र तुकडी करतात, जे नियमाविरुद्ध आहे. या शाळांची सखोल तपासणी करण्यात येईल. मूल्यांकनात ६० टक्के पेक्षा कमी गुण मिळाल्यास शाळा अपात्र ठरवली जाईल, असा शासन निर्णय विभागाने ४ सप्टेंबर रोजी जारी केला आहे. – डॉ. अशोक वुईके, आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र