न्यायालयीन चौकशीची वकिलाची मागणी

मुंबई : वैद्यकीय जामिनासाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असतानाच शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचे सोमवारी वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनाची माहिती सोमवारी रुग्णालयाने उच्च न्यायालयाला दिली. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी स्वामी यांच्या मृत्यूस राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि तळोजा कारागृह कारणीभूत असल्याचा आरोप केला. एनआयए आणि तळोजा कारागृह प्रशासन यांच्या निष्काळजीपणामुळे स्वामी यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत गेली, त्यांना वेळीच उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी वकिलांनी न्यायालयाकडे केली.

स्टॅन स्वामी यांच्या निधनाची माहिती मिळताच न्यायालयालाही धक्का बसला. आपल्याला या घटनेबाबत काय बोलावे कळत नाही. परंतु स्वामी यांच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच आशा व्यक्त करतो, असे न्यायमूर्ती शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने म्हटले.

स्वामी यांची तब्येत खूपच ढासळल्याने त्यांना श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. सोमवारी त्यांच्या वकिलांनी खंडपीठासमोर स्वामी यांच्या वैद्यकीय जामिनासाठी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यावेळी स्वामी यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेतली जाईल, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांचा नवा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणीला ‘एनआयए’ने विरोध के ला. तर होली फॅमिली रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक इयान डिसोजा यांना न्यायालयात काही माहिती द्यायची आहे, असे स्वामी यांचे वकील मिहिर देसाई यांनी सांगितले. स्वामी यांचे दुपारी दीडच्या सुमारास निधन झाल्याची माहिती डिसोजा यांनी न्यायालयाला दिली. स्वामी यांना सकाळी हृदय विकाराचा झटका आला. परंतु त्यानंतर ते शुद्धीवर आलेच नाही. दुपारी अखेर त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. अन्य आजार आणि करोना संसर्गातून बरे झाल्यानंतर उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.

..तर न्यायालयीन चौकशी

स्वामी यांच्या मृत्युची न्यायालयीन चौकशी करण्याच्या मागणीबाबत न्यायालयाने कोणतेही आदेश दिले नाहीत. परंतु फौजदारी दंडसंहितेच्या कलम १७६(१ए) नुसार कोठडी मृत्युची न्यायालयीन चौकशी करणे बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद केले. ही तरतूद स्वामी यांच्या प्रकरणात लागू होत असेल तर त्याची राज्य सरकार आणि तपास यंत्रणेने अंमलबजावणी करायला हवी, असेही न्यायालयाने म्हटले.

..ती इच्छा अपूर्णच!

’ऑक्टोबर २०२०मध्ये अटक झाल्यापासून स्वामी तळोजा कारागृहाच्या रुग्णालयात दाखल होते.

’तेथेच त्यांची प्रकृती खालावली. जेजे रुग्णालयात दाखल होण्यापेक्षा मी कारागृहातच मरणे पसंत करेन, असे ते म्हणाले होते.

’वैद्यकीय जामीन मिळाल्यास आयुष्याची संध्याकाळ मित्रांबरोबर घालवायची असल्याचे स्वामी यांनी मेमध्ये झालेल्या सुनावणीत न्यायालयाला सांगितले होते.

मृतदेह सहकाऱ्याकडे 

स्वामी यांचे कुटुंब नाही. झारखंड येथील चर्च हेच त्यांचे कुटुंब आहे. त्यामुळे त्यांचा मृतदेह त्यांच्या सहकाऱ्याच्या ताब्यात देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अ‍ॅड्. देसाई यांनी केली. त्यांची ही मागणी न्यायालयाने मान्य के ली. तसेच करोना निर्बंधांचे पालन करून स्वामी यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.