मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचे तसेच अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांमधील गैरसोयीबाबत त्रयस्थ संस्थेमार्फत (थर्ड पार्टी ऑडिट) पाहणी करून कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी शनिवारी दिली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी उपोषण आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन उईके यांनी केले आहे.
पुणे, नाशिक आणि नागपूर येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी गेल्या १७ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी उपोषण आंदोलन सुरू केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या समस्यांना वाचा फोडली होती. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी वर्षा निवासस्थानी विभागाचे अधिकारी आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांबरोबर बैठक घेतली.
आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले. अशोक उईके यांनी या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी शिष्टमंडळांचे सर्व प्रश्न ऐकून घेतले असून त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे आपण पुणे येथे जाऊन उपोषण मागे घेण्याची विनंती विद्यार्थ्यांना करणार आहोत. दरम्यान, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली म्हणून राहुल गांधी, आमदार रोहित पवार यांचे आभार मानले आहेत.
मागण्यांबाबत बैठकीत चर्चा
- ’बैठकीत बिंदूनामावली आणि पेसा क्षेत्रातील भरतीबाबत चर्चा झाली.
- ’आतापर्यंत ९ संवर्गाची भरती झाली असून उर्वरित सहा संवर्गाची भरती सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
- ’अधिसंख्य पदांबाबत तीन महिन्यांच्या आत संख्या निश्चित करून पुढील सहा महिन्यांच्या आत त्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आदिवासी विकास मंत्र्यांनी स्पष्ट केले.
