टीआरपी घोटाळ्यातील आरोपी असलेल्या रिपब्लिक टीव्ही या वृत्त वाहिनीच्या तीन कर्मचाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हा घोटाळा उघडकीस आणला होता.

रिपब्लिक टीव्हीचे कर्मचारी सिवा सुब्रमण्यम, शिवेंद्र मुंढेकर आणि रणजित वॉल्टर या तिघांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांनी निकाल दिला आहे. न्यायाधीशांनी या दोघांनाही एक लाखांचा दंड भरणं, तपासासाठी वेळोवेळी हजर राहणं, न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश न सोडणं अशा अटी घातल्या आहेत.

हेही वाचा- समजून घ्या : TRP म्हणजे काय आणि तो कसा मोजतात?

टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध दुसरे आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर नऊ महिन्यांनी पोलिसांनी अर्णब गोस्वामींचे नाव आरोपपत्रात दाखल केले आहे.

पोलिसांनी कोर्टात १,८०० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते ज्यात गोस्वामी आणि एआरजी आऊटलर मीडिया यांच्यासह आणखी चार लोकांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना दोषी ठरवले होते. ज्यामध्ये जीन ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) इंडियाचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीच्या सीईओ विकास खानचंदानी यांचा समावेश होता.

आणखी वाचा- टीआरपी घोटाळा प्रकरणात अर्णब गोस्वामी आरोपी; मुंबई पोलिसांनी दाखल केले आरोपपत्र

२४ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने गोस्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर अटकेपासून मर्यादित संरक्षण दिले होते. याचिकेमध्ये पोलीस, विशेषत: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरूद्ध गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला होता.