विजयनिदर्शक बोटांत सिगारेट अडकली तेव्हा..

इतर मित्रांप्रमाणे आपल्याला ‘गर्ल फ्रेण्ड’ नाही ही खंत साहिलचं मन पोखरत होती.

drug addiction
प्रतिनिधिक छायाचित्र

मुलांच्या हाती खेळत असलेला पैसा आणि शैक्षणिक संस्थांजवळ सहज उपलब्ध असलेले अंमली पदार्थ, यामुळे व्यसनांचा विळखा उद्याच्या पिढीला गिळंकृत करीत आहे.. यापासून कोणताही आर्थिक, सामाजिक स्तर सुटलेला नाही.. या व्यसनाधीनतेचा सामना कसा करायचा, नव्या पिढीला या संकटातून कसं सोडवायचं, या गंभीर प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा एक प्रयत्न.. या सर्व घटना अगदी खऱ्या आहेत, आपल्या अवतीभवतीच घडलेल्या आहेत, त्यातली नावं मात्र बदलली आहेत..

घरची आर्थिक सुबत्ता.. डिस्लेक्सियाच्या जन्मजात आजारावर निर्धारानं मात करीत दहावीत मिळवलेले ९० टक्के.. आणि संगणकाचे अवगत असलेले हुकूमी ज्ञान.. या जोरावर उच्चभ्रू घरातला साहिल हा खरंतर विजय निदर्शक दोन बोटं उंचावून जगात ताठ मानेनं वावरेल, असंच सगळ्यांना वाटत होतं.. पण विजय निदर्शक त्या दोन बोटांतच सिगारेट अडकली आणि तिनं त्याला हळूहळू चरस आणि गांजाच्या विळख्यात कधी नेलं, ते त्यालाही कळलं नाही.. आज अनेक वर्षांच्या खडतर धडपडीनंतर साहिलच्या हातातली सिगारेट सुटली असली, तरी आयुष्याची विस्कटलेली घडी पूर्ववत करण्याचा संघर्ष संपलेला नाही.

इतर मित्रांप्रमाणे आपल्याला ‘गर्ल फ्रेण्ड’ नाही ही खंत साहिलचं मन पोखरत होती. दिवसागणिक ही भावना तीव्र होत होती आणि आता हळूहळू आत्मविश्वासही ढळू लागला होता. त्यातून आलेल्या नैराश्यावर मात करण्यासाठी तो एकदा हुक्का पार्लरमध्ये गेला, कुतूहल म्हणून त्यानं ‘झुर्रका’ही मारून पाहिला, पण तो आपल्याला पेलवत नाही, हे त्याला जाणवलं. मग हातात ‘सिगारेट’ आली आणि तीच त्याची मैत्रीण झाली! त्या सिगारेटने हळूहळू त्याला चरस, गांजाच्या मिठीत कधी अडकवलं, त्याला कळलंही नाही. त्या मिठीतून त्यानं आज स्वत:ला नेटानं सोडवलं आहे खरं, पण आजही त्याचं मन स्थिर झालेलं नाही.

‘‘आत्ताही मला नीट काही सुचत नाहीये.. दुपारीच तर झोपलो होतो. रात्रीचे आठ वाजले तेव्हा कशीबशी जाग आली..  सकाळी कॉलेजला गेलो होतो. मधल्या वेळेत संगणकावर गेम्सही खेळलो, त्यानंतर झोप कधी लागली कळलंच नाही आणि जाग आली तेव्हाही किती वेळ गेला, कळलंच नाही.. गेले कित्येक दिवस हेच सुरू आहे!’’ अवघ्या २२ वर्षांचा साहिल विषण्ण स्वरात सांगत होता. आई रेल्वेत मोठय़ा पदावर आणि वडील व्यावसायिक. त्यामुळे घरात सुबत्ता.. पण तिचं प्रतिबिंब जगण्यात नाही.. इतका खोल परिणाम पाच वर्ष टिकलेल्या त्या ‘मैत्री’चा.

दहावीला ९० टक्के गुण मिळाल्यावर महाविद्यालयात उत्साहात पाऊल टाकलेल्या साहिलचे सुरुवातीचे काही दिवस मस्त, मजेत गेले. काही काळानंतर मात्र, मित्रांप्रमाणेच ‘आपल्यालाही गर्लफ्रेंड असावी’, असे त्याला वाटू लागले. दिवसागणिक ही भावना तीव्र होत होती, आणि मनासारखे घडतही नव्हते. त्याचा आत्मविश्वासच ढळू लागला. आयुष्य नीरस वाटू लागलं. या काळातच एकदा तो मित्रांसोबत हुक्का पार्लरमध्ये गेला. हुक्क्याविषयीचं अनेक दिवस मनात घोळत असलेलं कुतूहल जागं झालं आणि साहिलनं पहिला ‘झुर्रका’ घेतला.. हे कुतूहल हळूहळू सिगरेट, गांजा, चरसकडे वळून आपल्याला अवघ्या पाच वर्षांत नशेबाज बनवेल, असं तेव्हा त्याला वाटलंही नव्हतं.

खरं तर संगणकशास्त्रावर चांगलीच पकड असल्याने याच विषयात पुढे शिकण्यासाठी त्याने आयआयटीमध्ये प्रवेशाची तयारी सुरू केली होती. मात्र याच काळात मैत्रीण नसल्याच्या भावनेने निराश होत तो व्यसनाच्या विळख्यात अडकला. मित्रांसोबतच एकदा तो अशा ठिकाणी गेला जिथे खूप मुलंमुली सिगारेट ओढत होती. पण ती चरसची होती. सुरुवातीला घाबरून त्यानं नकार दिला मात्र ‘एकदा तर ओढून पाहू’ या विचारानं उचल खाल्ली आणि तो दिवस चरसच्या नशेत सरला..  सर्वजण घरी जायला निघाले तेव्हा ‘आता या अवस्थेत घरी कसं जायचं’, या विचारानं त्याचे धाबे दणाणले. त्याचं नशीब किंवा आई-वडीलांचं कमनशिब बलवत्तर होतं म्हणून आई पार्टीला गेली असल्याने घरी नव्हती आणि वडील फोनवर व्यावसायिक चर्चामध्ये गुंतले होते.. त्यामुळे तो थेट आपल्या खोलीत जाऊ शकला..

यानंतर त्याची भीड हळूहळू चेपत गेली. चरसची चव अधूनमधून तो घेत होता. अभ्यासात मात्र लक्ष लागत नव्हतं. आयआयटीच्या कोचिंगलाही दांडी मारणं सुरू झालं. तरी त्यानं बारावीला कसेबसे ७४ टक्के गुण मिळविले. मात्र जेईईच्या परीक्षेत त्याला चांगले गुण मिळाले नाहीत. मात्र  डिस्लेक्सियाच्या आधारावर त्याला आयआयटी कानपूरमध्ये पहिल्या वर्षांच्या तयारीची संधी देणाऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला. कानपूरमध्ये तो गेला, पण शहरी वातावरणाची सवय आणि व्यसनाचा अभाव यामुळे त्याचं मन बेचैन होऊ लागलं. मग कळलं की कानपूरमध्ये चरस नाही, पण भांगेच्या गोळ्या मिळतात. त्या भांगेची नशा मग सुरू झाली. यादरम्यान एक छोटासा अपघातही झाला. परीक्षाही तो जेमतेम उत्तीर्ण झाला.

सुटीत तो घरी आला तेव्हा त्याच्या आईला प्रथम संशय येऊ लागला. त्याचा मामाही याच व्यसनात अडकला होता त्यामुळे तिला पूर्वानुभवाची जोड होती. तरीही नेमकं काय करावं, तिलाही सुचत नव्हतं. त्यातच आपल्याच इमारतीच्या गच्चीतही व्यसनाची सोय आहे, हे साहिलला समजलं आणि मग तर त्याचा तोल पूर्ण सुटला. नशा हाच दिनक्रम झाला.

पुढे आयआयटीला त्याला प्रवेश मिळाला, पण नशेत वाहवत जाणंही वाढत होतं. तरीही आयआयटीतल्या पहिल्या वर्षी सर्वच विषयांत उत्तम गुण मिळवणाऱ्या साहिलची शैक्षणिक प्रगती तिसऱ्या वर्षी शून्य गुणांवर आली आणि आयआयटी सोडून तो पुन्हा मुंबईत परतला. त्याला सुधारण्याचे अनेक प्रयत्न त्याची आई आणि आजी-आजोबा यांनी केले. मात्र त्यात यश येत नव्हतं. साहिलला एका व्यसनमुक्ती केंद्रातही दाखल केलं होतं. पण तिथं फारच कठोर वागवितात, हे कळल्याने आईच्या हृदयात कालवाकालव झाली. तिने हट्ट धरला, आणि त्याला घरी परत आणलं. मग समुपदेशकांची मदत सुरू झाली आणि शेवटी एका व्यसनमुक्त गटात त्याला पाठविण्यास सुरुवात झाली.

या अथक प्रयत्नांनंतर आता गेलं वर्षभर साहिल नशेपासून दूर आहे. मात्र त्याचं मन अजूनही विचलित आहे. सध्या तो संगणाक विषयातच पुढे शिकत असला तरी संगणक हेही एक व्यसनच आहे, असं त्याला वाटत आहे. त्यामुळे संगणकापलीकडे काहीतरी करण्याचा त्याचा विचार आहे.. प्रकाशानं उजळलेली वाट तो चाचपडत असला, तरी त्याचवेळी अनेक शेकडो ‘साहिल’ व्यसनाच्या अंधारदरीकडे पावलं टाकत आहेत, हे वास्तवही भीषण आहेच..

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: True story of student trapped in drug addiction

ताज्या बातम्या