मुंबई पोलिसांकडून होणार्‍या कारवाईचा धसका घेऊन काही मंडळींनी घरपोच हुक्का सेवा सुरू करून छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर चालविण्याचा घाट घातला आहे. घरपोच हुक्का व साहित्य पोहोचवणाऱ्या दोन आरोपींना गोरेगाव पोलिसांनी अटक केली असून आरोपी दोन हुक्का पार्ट्यांचे आयोजन करणार होते, अशी माहिती चौकशीतून उघड झाली.

गोरेगाव येथील एका गृहनिर्माण संस्थेत ही कारवाई करुन पोलिसांनी मोहम्मद बुलबुल नूरमोहम्मद हुसैन आणि मोहम्मद सैफ रफिक पटवारी या दोघांना अटक केली. या दोघांकडून हुक्कासंदर्भातील काही साहित्य पोलिसांनी जप्त केले असून ते दोघेही पार्ट्यांसाठी हुक्का आणि इतर साहित्य पुरविण्याचे काम करीत होते.

गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांनी हुक्का पार्लरविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेअंतरर्गत आतापर्यंत अनेक हुक्का पार्लरवर कारवाई करुन पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळे शहरातील बहुतांश हुक्का पार्लर बंद झाले होते. त्यामुळे हुक्का पार्लरचालक आता या नव्या कार्यपद्धतीचा वापर करीत असून काहीजण पार्ट्यांसाठी संबंधित ठिकाणी हुक्का आणि त्याचे साहित्य पोहोचवण्याचे काम करीत होते. गोरेगाव परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीमध्ये अशाच प्रकारे हुक्का पुरविण्यात येणार असल्याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली होती.

या पथकाने गोरेगाव येथील एका गृहनिर्माण सोसायटीत छापा टाकून मोहम्मद बुलबुल आणि मोहम्मद सैफ या दोघांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी हुक्का फ्लेव्हर, कोळसा, शेगडी, पाइप, चिमटे, चिलीम आदी मुद्देमाल जप्त केला. सैफ हा छोट्या पार्ट्यांसाठी हुक्का पुरविण्याचे काम करीत होता. या दोघांविरुद्ध सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली.