scorecardresearch

मुंबई : क्षयरोग रुग्णांची करणार जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी

क्षयरोगासंदर्भातील १७ औषधांसंदर्भात ही चाचणी करण्यात येणार असून, त्यासाठी मुंबईतील २ हजार ५०० रुग्णांची यासाठी निवड करण्यात येणार आहे.

Tuberculosis patients genome sequencing mumbai
मुंबई : क्षयरोग रुग्णांची करणार जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

मुंबई : मुंबईतील क्षयरोग रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांना अधिक चांगले उपचार आणि दर्जेदार औषधे मिळावीत यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून क्षयरोग रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी करण्यात येणार आहे. क्षयरोगासंदर्भातील १७ औषधांसंदर्भात ही चाचणी करण्यात येणार असून, त्यासाठी मुंबईतील २ हजार ५०० रुग्णांची यासाठी निवड करण्यात येणार आहे.

क्षयरोगाच्या विविध उपप्रकारामुळे रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांचा परिणाम होण्यास विलंब होत आहे. क्षयरोगाचे उपप्रकार ओळखून योग्य औषधे उपलब्ध करून रुग्णांना अवघ्या काही दिवसांत दिलासा मिळावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने स्माईल फाऊंडेशनच्या सहकार्याने मुंबईतील क्षयरोग रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मुंबईतील विविध विभागांतून २ हजार ५०० रुग्णांची निवड करण्यात येणार आहे. या रुग्णांचे नमूने घेऊन ते केईएम रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. तेथून हे नमुने जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी आयआयटी मुंबईमध्ये असलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

हेही वाचा – जे.जे. रुग्णालयात लवकरच रोबोटिक शस्त्रक्रिया! २० कोटी खर्चाला तत्त्वत: मान्यता

मार्चपासून सुरू करण्यात आलेल्या उप्रकमांतर्गत आतापर्यंत ३० ते ४० रुग्णांचे नमूने घेण्यात आले आहेत. लवकरात लवकर अधिकाधिक रुग्णांचे नमूने घेऊन ही चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीसाठी १७ औषधांची यादी तयार करण्यात आली आहे. क्षयरोगाच्या उपप्रकारानुसार कोणती औषधे अधिक परिणामकारक ठरणार आहेत, हे तपासून त्यानुसार रुग्णांवर उपचार करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सागितले.

हेही वाचा – मुंबई : तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

सध्या रुग्णांना देण्यात येत असलेल्या उपचारांनुसार एखाद्या औषधाचा परिणाम होण्यास साधारणपणे एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र सिक्वेन्सिंग चाचणीतून येणाऱ्या अहवालानुसार करण्यात येणाऱ्या औषधोपचारामुळे रुग्णांना अधिक जलद गतीने दिलासा मिळण्यास मदत होणार आहे, असे मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 00:10 IST

संबंधित बातम्या