मुंबई : वांद्रे येथील एमआयजी क्लब गेल्या ४० दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे बंद आहे. या क्लबमध्ये सुरु असलेल्या कॅटरिंग सेवेसाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचा परवानाच घेतला गेला नव्हता, असे स्पष्ट झाले आहे. क्लबपासीन काही अंतरावर असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाचे एमआयजी क्लब हा हक्काचे कॅन्टिन असल्यासारखे होते. अधिकाऱ्यांचे स्वागत वा निरोप समारंभ तसेच कुठलेही कार्यक्रम या ठिकाणी जवळपास मोफत होत होते. परंतु विद्यमान आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईमुळे एफडीए अधिकाऱ्यांची अशा केलेली शिष्टाईदेखील क्लबच्या उपयोगी पडली नसल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे आता क्लबला परवाना घ्यावाच लागणार आहे. एमआयजी क्लब हा गेल्या तब्बल सव्वा महिन्यापासून बंद आहे. या क्लबची जेव्हा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली तेव्हा किचनमध्ये अस्वच्छता आढळली होती. याबाबत २०१६, २०१९, २०२३ आणि आताही प्रशासनाने सुधारणा नोटिस जारी करण्यात आली. मात्र यावेळी मुंडे यांच्या दणक्यामुळे एमआयजी क्लबला सर्व उपहारगृहे बंद ठेवावी लागली. पहिल्यांदाच क्लब अशा रीतीने दीर्घ काळासाठी बंद राहिला आहे. आतापर्यंत अन्न व औषध प्रशासनाच्या अमर्याद सहकार्यामुळे विनापरवाना उपहारगृहे सुरु होती हे स्पष्ट झाले आहे.
मात्र आता मुंडे आयुक्त असेपर्यंत तरी अन्न व औषध प्रशासनाला याचा कॅन्टिन म्हणून वापर करण्यावर तात्पुरती बंदी येणार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अनेक कार्यक्रम या क्लबमध्ये वारंवार होत असत. त्यामुळेच यासाठी आवश्यक कॅटरिंग सेवेसाठी आवश्यक परवाना घेण्यात आलेला नव्हता, असेही आता स्पष्ट झाले आहे. क्लबने अन्न व औषध प्रशासनाकडे पूर्तता अहवाल सादर केला आहे. यामुळे परवाना पुन्हा बहाल करण्यापूर्वी क्लबची नव्याने तपासणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या क्लबचा अन्न व्यवसाय परवाना प्रशासनाने २८ जुलै रोजी स्थगित केला होता. एफडीएने निर्देशित केलेली चत्रुटी-सुधारणेची कामे पूर्ण केल्यानंतर, क्लबने गेल्या आठवड्यात पूर्तता अहवाल सादर केला.
पुढील दोन ते तीन दिवसांत अधिकारी क्लबची पाहणी करतील अशी अपेक्षा आहे; त्यानंतरच क्लबचा खाद्यपदार्थ विक्रीचा परवाना स्थगित करण्याबाबतचा निर्णय मागे घेण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. नियमांचे पालन न करता केवळ एफडीए अधिकाऱ्यांच्या शिष्टाईवर क्लबमधील उपहारगृहे सुरु होती, ही बाब उघड झाली आहे. एफडीएला अनेक उल्लंघने आढळल्यानंतर क्लबचा अन्न परवाना रद्द करण्यात आला. यात वैध एफएसएसएआय परवान्याशिवाय सुरू असलेला अनधिकृत केटरिंग व्यवसाय, स्वयंपाकघरात जिवंत झुरळे आणि कोळ्याची जाळी, कच्च्या तसेच शिजवलेल्या शाकाहारी आणि मांसाहारी अन्नाची अयोग्य हाताळणी व साठवणूक, तसेच अन्न आणि पाण्याची नियतकालिक तपासणी करण्यात आलेले अपयश आदींचा समावेश होता.
प्रशासनाला माहिती न देता केलेले अनधिकृत संरचनात्मक आणि व्यवस्थापकीय बदल, पात्र तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव आणि अन्न हाताळणाऱ्यांच्या अनिवार्य आरोग्य नोंदींची अनुपस्थिती या गोष्टीही तपासणीत निदर्शनास आल्या होत्या. क्लबला यापूर्वी २०१६, २०१९ आणि २०२३ मध्ये त धारणेबाबतच्या नोटिसा मिळाल्या होत्या. या नोटिसांनंतर फारसा पाठपुरावा केला गेला नाही आणि केवळ काही त्रुटी दूर करूनच आस्थापनांनी पुन्हा कामकाज सुरू केले. क्लब ४० दिवस बंद राहिल्यामुळे आर्थिक नुकसान झाले; परंतु या प्रक्रियेमुळे अन्नसुरक्षेच्या नियमांचे पूर्णपणे पालन होईल, अशा अपेक्षा क्लबच्या व्यवस्थापकीय समितीने व्यक्त केली आहे. क्लबने पूर्तता अहवाल सादर केला आहे. त्यानुसार पुन्हा तपासणी करुन क्लबच्या परवान्याबाबत निर्णय घेतला जाईल, पी. एस. सिंगरवार, सहआयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन
