मुंबई : पुण्यात मे महिन्यात घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेत १९ बळी गेल्यानंतर राज्यातील ७० मिथेनॉल उत्पादक कंपन्यांचे परवाने अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रद्द केले होते. त्यामध्ये समावेश असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेतृत्वाच्या जवळच्या रांजणगाव एमआयडीसीतील एका बड्या कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला होता. त्या कंपनीवरील कारवाईला पक्षांतर्गत दबावामुळेच मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्थगिती दिली आहे.

राज्यातील मिथेनॉल उत्पादक सर्व ९३६ कंपन्यांची जून महिन्यात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. त्यामध्ये ३०९ कंपन्यांमध्ये मिथेनॉलची विक्री व साठवणुकीबाबत अनियमितता आढळली होती. त्यामुळे ७० कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले होते. त्यापैकी २२ कंपन्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री झिरवाळ यांच्याकडे दाद मागितली होती.

अपील करणाऱ्या कंपन्यांमध्ये राष्ट्रवादी नेतृत्वाशी जवळीक असणाऱ्या रांजणगावच्या मिथेनॉल उत्पादक कंपनीचाही समावेश होता. या कंपनीवरील कारवाईला स्थगिती द्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) पुणे जिल्ह्यातील विद्यमान आमदार असलेल्या एका माजी मंत्र्याने मंत्री झिरवाळ यांच्याकडे शिफारस केली होती. या कंपनीत राष्ट्रवादीच्या शीर्षस्थ नेतृत्वाचे संबंध असल्याची चर्चा आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून विभागाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींमध्ये ५५७ टक्के वाढ झाली आहे. येणाऱ्या तक्रारींच्या चौकशीच्या निपटाऱ्याच्या प्रमाणात ३७८ टक्के, जप्त मालामध्ये २१७ टक्के, तर गुन्हे दाखल करण्याच्या प्रमाणात २११ टक्के वाढ झाली आहे.

विभागाचे मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयाची स्थिती यांच्या उलट आहे. अन्न परवान्याशी संबंधित अपिलीय प्राधिकारी आयुक्त तुकाराम मुंढे असून औषधे, सौंदर्य प्रसाधने, विषारी उत्पादने, रक्तपेढी, प्रयोगशाळा या आस्थापनांसंदर्भातील कारवायांचे अपिलीय प्राधिकारी विभागाचे मंत्री झिरवाळ आहेत.

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयाकडे औषध विक्री परवान्याशी संबंधित २,४१८ अपिले प्रलंबित आहेत. प्रलंबित अपिलांची संख्या सतत वाढत असल्यामुळे व मंत्री कार्यालयात अपीलांच्या सुनावणीसाठी हेलपाटे घालावे लागत असल्यामुळे औषध विक्रेत्यांच्या संघटना आता मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याच्या तयारीत आहेत.

सौजन्य – लोकसत्ता टीम

माझ्यावर दबाव नाही:

अन्न व औषध प्रशासन आयुक्त कार्यालयाने केलेल्या कारवायांसंदर्भात माझ्याकडे सुनावण्या होतात. मात्र त्या संदर्भात पक्ष नेतृत्वाचा माझ्यावर आज पर्यंत कधीही दबाव आलेला नाही. अपिलकर्ते जी वस्तुस्थिती समोर मांडतात, ते पाहून सदसद्विवेकबुद्धीनुसार मी निवाडे देतो. या विभागाच्या मंत्रीपदाचा मी कारभार स्वीकारला तेव्हा, मंत्री कार्यालयाकडे ८,५०० अपिले प्रलंबित होती. त्या अपिलांची संख्या मी आता २,५०० पर्यंत खाली आणली आहे. – नरहरी झिरवाळ, मंत्री, अन्न व औषध प्रशासन