मुंबई : “सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध आणि सुरक्षित महाराष्ट्र ” या जनहिताच्या ध्येयाने प्रेरित होऊन अन्न व औषध प्रशासनाने कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात दोन महत्त्वपूर्ण कारवाया करून सार्वजनिक आरोग्याशी तडजोड करणाऱ्या घटकांविरुद्ध कठोर पाऊल उचलले आहे. या कारवाईत एकूण २४.८१ लाख रुपये किमतीचा बेकायदेशीर औषधसाठा जप्त करण्यात आला असून संबंधित प्रकरणांमध्ये पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
कोल्हापूरमध्ये परवान्याशिवाय औषधसाठा जप्त
अन्न व औषध प्रशासनाने ८ जून २०२६ रोजी कोल्हापूरमधील रविवार पेठ येथील मे. मेडटॅब्स फार्मा प्रा. लि.वर छापा टाकला. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथिक औषधे, विशेषतः प्रतिजैविक इंजेक्शन्सचा साठा आढळला. या औषधांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील आवश्यक परवाने व वैध कागदपत्रे सादर करण्यात संबंधित संस्था अपयशी ठरल्याने औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी औषधांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित २९ प्रकारच्या औषधांचा १३ लाख ६२ हजार १४७ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
पुण्यात नामांकित औषध कंपनीवर कारवाई
पुणे जिल्ह्यातील वडकी येथील मे. सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेडच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान”रेक्टीन प्लस टॅब्लेट ” या ‘शेड्युल्ड एच’अंतर्गत येणाऱ्या प्रिस्क्रिप्शन औषधाच्या वेष्टनावर औषधाच्या वापराबाबत जाहिरात करण्यात आल्याचे आढळून आले. अशा प्रकारची जाहिरात औषधे व सौंदर्यप्रसाधने नियम, १९४५ मधील तरतुदींशी विसंगत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे औषधाचा सुमारे १ कोटी ११ लाख १९ हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
नागरिकांना आवाहन –
औषधे केवळ अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. – औषध उत्पादक व विक्रेत्यांनी कायदे व नियमांचे काटेकोर पालन करावे. – संशयास्पद औषध विक्री अथवा बेकायदेशीर साठ्याची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावी.राज्यात औषध उत्पादन, साठवण, वितरण व विक्री क्षेत्रातील कोणतीही बेकायदेशीर बाब खपवून घेतली जाणार नाही. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर आणि सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाई पुढेही सुरू राहील.- तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
