मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भेसळयुक्त आणि असुरक्षित मसाल्यांची विक्री रोखण्यासाठी राज्यभरात धडक कारवाई केली. राज्यभरात १ एप्रिल ते २९ ऑक्टोबर या कालावधीत मसाले व मसालेजन्य पदार्थांच्या १ हजार ५७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत सुमारे १९ कोटी ७० लाख रुपये किमतीचा ११ हजार ९६३ क्विंटल मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच ८४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, ५५७ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
एफडीएने २३ ते २९ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत कारवाईला वेग देण्यात आला. या सात दिवसांत ४७२ आस्थापनांची तपासणी करून ७८३ नमुने घेण्यात आले. यावेळी ७२ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर १३ कोटी ६० लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या मोहिमेतील जप्तीचे मूल्य एप्रिलपासूनच्या एकूण जप्तीच्या सुमारे ६९ टक्के आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक ६ कोटी ४२ लाख ७७ हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तर सर्वाधिक २७ परवाने निलंबित करण्यात आले. पुणे विभागात ३ कोटी ९९ लाख ५३ हजार रुपये, कोकण विभागात ३ कोटी १९ लाख २५ हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. नाशिक विभागात २ कोटी ८२ लाख ९२ हजार रुपये, नागपूर विभागात २ कोटी ५ लाख ६८ हजार रुपये, अमरावती विभागात ८४ लाख ४४ हजार रुपये, तर बृहन्मुंबई विभागात ३४ लाख ९१ हजार रुपये किमतीच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली. पुणे आणि अमरावती विभागांत प्रत्येकी १४, बृहन्मुंबई आणि कोकण विभागांत प्रत्येकी १२, नाशिकमध्ये आठ, तर नागपूर विभागात सात परवाने निलंबित करण्यात आले. मुंबईतील १० आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.
नमुना तपासणीचे अहवाल प्रतीक्षेत
आतापर्यंत प्राप्त झालेल्या विश्लेषण अहवालांनुसार ३३७ नमुने प्रमाणित आढळले. नऊ नमुने अप्रमाणित, सहा असुरक्षित, तर १८ नमुने मिथ्याछाप असल्याचे स्पष्ट झाले. अद्याप १,०५३ नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे तपासणी अहवालांनंतर आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे. निलंबनाच्या कालावधीत संबंधित आस्थापनांना अन्न व्यवसाय करता येणार नाही. तसेच जप्त साठ्याची विक्री, वाहतूक, हस्तांतरण, पुन्हा पॅक करणे किंवा लेबल बदलण्यास सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय मनाई करण्यात आली आहे.
अन्न व्यवसाय चालकांनी कच्च्या मालाच्या स्रोताची नोंद, खरेदी-विक्रीचे अभिलेख आणि योग्य लेबल असलेल्या पॅकबंद मसाल्यांची विक्री याबाबत नियमांचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. संशयास्पद किंवा भेसळयुक्त मसाल्यांबाबत नागरिकांनी १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा अधिकृत तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
