मुंबईतील खाद्यप्रेमींचे लाडके आणि तब्बल ४० वर्षांची परंपरा असलेले महालक्ष्मी रेसकोर्स येथील ‘गॅलॉप्स’ हे प्रसिद्ध रेस्टॉरंट अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) तडकाफडकी बंद केले आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि किचनमधील कमालीची अस्वच्छता आढळल्याने प्रशासनाने ही कठोर कारवाई केली आहे. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

बर्फाच्या पेटीत रक्ताचे डाग अन् किचनमध्ये झुरळे!

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीए पथकाने आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. महालक्ष्मी रेसकोर्स येथील ‘रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब’च्या आवारात असलेल्या ‘मेसर्स बीजीआरएस’ (गॅलॉप्स) रेस्टॉरंटमध्ये तपासणीदरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

हॉटेलचे किचन जिथे अत्यंत स्वच्छ असायला हवे, तिथे रेफ्रिजरेटरमधील बर्फावर मांसाचे, रक्ताचे आणि केचअपचे डाग आढळले. एवढेच नाही तर स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, मुंग्यांचा सुळसुळाट, साचलेले पाणी आणि उघडे सांडपाण्याचे नाले असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

एफडीएच्या तपासणीत उघड झालेल्या प्रमुख त्रुटी:

  • फाटलेल्या व खराब झालेल्या पॅकिंगमध्ये कच्चा माल साठवून ठेवण्यात आला होता.
  • हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी आणि लसीकरणाचा कोणताही अधिकृत रेकॉर्ड नव्हता.
  • भिंतींची पडझड, तेलकट-चिकट परिसर आणि ड्रेनेज लाईनवर झाकणे नसणे अशा गंभीर त्रुटी आढळल्या.

४० वर्षांचा ऐतिहासिक वारसा अन् अचानक कारवाई

गॅलॉप्स रेस्टॉरंटची सुरुवात १९८६ मध्ये जस्मिन, बॉबी सिंग आणि राहुल मलिक या तीन मित्रांनी केली होती. महालक्ष्मी रेसकोर्सच्या हिरवळीसमोर वसलेले हे रेस्टॉरंट मुंबईतील उच्चभ्रू आणि खवय्यांच्या आवडीचे ठिकाण मानले जाते. नुकतीच या रेस्टॉरंटने आपल्या यशस्वी वाटचालीची ४० वर्षे पूर्ण केली होती. मात्र, या कारवाईमुळे हॉटेलच्या नावावर मोठा डाग लागला आहे.

या कारवाईवर स्पष्टीकरण देताना गॅलॉप्सच्या प्रवक्त्याने सांगितले, “FSSAI च्या नियमावलीनुसार आवश्यक सुधारणा आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही तात्पुरती विक्री बंद केली आहे. ग्राहकांच्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी असून लवकरच पुढील माहिती देऊ.”

मुंबईत एफडीएचा धडाका: भेसळयुक्त तूप अन् विनापरवाना हॉटेल्सवरही टांच

सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर एफडीएने जोरदार बडगा उगारला आहे. गॅलॉप्स व्यतिरिक्त मुंबईतील इतर ठिकाणीही मोठी कारवाई करण्यात आली आहे:

  • मालाड (पूर्व): ‘मेसर्स गुरुकृपा डेअरी प्रॉडक्ट्स’वर धाड टाकून सुमारे १३.५५ लाख रुपये किमतीचे २,४६४ किलो भेसळयुक्त तूप, वनस्पती आणि रिफाइंड सूर्यफूल तेल जप्त करण्यात आले.
  • अंधेरी (गुफरान सीख कॉर्नर): वर्सोवा-यारी रोडवरील हे हॉटेल वैध परवान्याशिवाय चालवले जात असल्याचे उघडकीस आले. एफडीएने २२ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून हे हॉटेल तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले.
  • वांद्रे (ड्रीमर्स हॉस्पिटॅलिटी व मिरारी): बँडस्टँड येथील ‘ड्रीमर्स हॉस्पिटॅलिटी’ आणि सेंट डोमिनिक रोडवरील ‘मिरारी’ या उपाहारगृहांमध्ये अस्वच्छता व आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.