मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार २५ मे ते २४ जून या कालावधीत राज्यभरात तब्बल ४४६ आस्थापनांवर धाडी टाकल्या. या कारवाईमध्ये ५ कोटी ५५ लाख ५ हजार २९४ किमतीचा माल जप्त करून ४५७ जणांना अटक करण्यात आली.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यातील एफडीएच्या अधिकाऱ्यांनी २५ मे ते २४ जूनदरम्यान मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या विभागात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध कारवाई केली. त्यामध्ये कोकण विभागात १५५ आस्थापनाविरुद्ध कारवाई करून २८ लाख ७७ हजार २०२ किमतीचा माल जप्त केला. तसेच १५६ जणांना अटक करण्यात आले. मुंबई विभागात ९० आस्थापनाविरुद्ध कारवाई करून ३९ लाख २ हजार ५३५ किमतीचा माल जप्त करून ८९ व्यक्तींना अटक केली. नाशिक विभागात ३१ आस्थापनाविरुद्ध कारवाई करून १ कोटी ४३ लाख २६ हजार ६०६ किमतीचा माल जप्त करत २९ व्यक्तींना अटक केली. नागपूर

विभागात ३८ अस्थापनांची तपासणी करून ९६ लाख ८८ हजार ३८१ किमतीचा माल जप्त करून २९ जणांना अटक केली. पुणे विभागात ८७ आस्थापनाविरुद्ध कारवाई करून ८४ लाख ८९ हजार ८८९ किमतीचा माल जप्त करण्यात आला तर छत्रपती संभाजीनगर विभागात ३८ आस्थापनाविरुद्ध कारवाई करून ९६ लाख ८८ हजार ३८१ किमतीचा माल व १३ वाहने जप्त केली. अमरावती विभागात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये २५ आस्थापनांवर कारवाई करून १ कोटी १४ लाख ७१ हजार ५०२ किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

या धडक मोहिमेअंतर्गत राज्यभरातून ४५७ व्यक्तींना अटक करून ५ कोटी ५५ लाख ५ हजार २९४ रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला जप्त करण्यात आला आहे.