मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुंबई आणि नवी मुंबईतील तीन अन्न आस्थापनांवर कारवाई केली आहे. मालाडमधील हॉटेल राधा, कुर्ल्यातील जनता तवा अँड ग्रिल आणि खारघर येथील सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील अन्न व्यवसायाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान गंभीर स्वच्छता त्रुटी, कच्च्या मांसाची अयोग्य साठवणूक, कीटक-उंदीर प्रतिबंधक उपायांचा अभाव तसेच अन्न संपर्कातील उपकरणांची अस्वच्छता आढळली.
मालाड पश्चिम येथील १८ ऑगस्ट रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी हॉटेल राधाची तपासणी केली. यावेळी स्वयंपाकघरात जिवंत उंदीरांचा प्रादुर्भाव असल्याचे आढळून आले. उघड्या ड्रेनेज लाईनमधून मोठा उंदीर स्वयंपाकघरात येताना दिसला. तसेच छताजवळ आणखी एक उंदीर आढळला. स्वयंपाकघरातील ड्रेनेज व्यवस्था उघडी आणि अस्वच्छ होती. त्यामुळे कीटक आणि उंदीरांचा प्रवेश होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवर, विशेषतः पीठ मळण्याच्या यंत्रावर, जिवंत झुरळे आढळली. यामुळे हॉटेलचा परवाना रद्द करत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कुर्ला पश्चिम येथील जनता तवा अँड ग्रिलची १९ ऑगस्ट रोजी केलेल्या तपासणीत कच्चे मांस आणि पोल्ट्री अयोग्य पद्धतीने साठविल्याचे आढळले. नाशवंत आणि कच्च्या अन्नपदार्थांसाठी आवश्यक तापमान नियंत्रित साठवणुकीची व्यवस्था उपलब्ध किंवा प्रदर्शित करण्यात आलेली नव्हती. अन्नपदार्थ, पॅकेजिंग साहित्य आणि बिगर-अन्न वस्तूंची गर्दीच्या ठिकाणी अव्यवस्थित साठवणूक करण्यात आली होती. अन्न, पॅकेजिंग आणि बिगर-अन्नपदार्थ वस्तूंसाठी योग्य विभाजनाची व्यवस्था नव्हती. अन्नाच्या संपर्कात येणारी उपकरणे आणि भांडी ग्रीस, अन्नाचे अवशेष आणि कार्बनच्या थराने मोठ्या प्रमाणात माखलेली होती. मोठ्या धातूच्या ट्रेवर डाग, गंजासदृश झीज आणि देखभालीचा अभाव असल्याचे आढळले. त्यामुळे हॉटेलचा परवाना रद्द करून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
खारघरमधील महाविद्यालयाच्या कॅन्टीनवरही कारवाई
नवी मुंबईतील खारघर येथील सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील अन्न व्यवसायाचीही १८ ऑगस्ट रोजी तपासणी करण्यात आली. सिध्दिविनायक एंटरप्रायजेस या नावाने सुरू असलेल्या या व्यवसायाची तपासणी करण्यात आली. यावेळी एफएसएसएआय नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी ठिकाणी लावलेले नसल्याचे आढळले. आस्थापनेने ‘फूड व्हेंडिंग एस्टॅब्लिशमेंट’ म्हणून नोंदणी घेतली असतानाही प्रत्यक्षात कॅन्टीन व्यवसाय सुरू असल्याचे तपासणीत आढळले. कीटकनाशक दिवे, उंदीर पकडण्यासाठी सापळे आणि कीटकप्रतिबंधक जाळ्या उपलब्ध किंवा बसविण्यात आलेल्या नव्हत्या. पुरेशी वायुवीजन व्यवस्था नव्हती. कच्च्या मालाच्या खरेदीसंदर्भातील आवश्यक नोंदी आणि निर्धारित तपशीलही उपलब्ध नव्हते. अन्नसुरक्षा आणि स्वच्छता त्रुटींची गंभीर दखल घेऊन संबंधित अन्न व्यवसायाचा एफएसएसएआय परवाना किंवा नोंदणी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
