मुंबईः राज्यातील तरुण पिढीला वाचविण्यासाठी, त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या आहारपुरक( न्युट्राॅस्युटीकल) उत्पादने आणि मद्यभेसळी विरोधात लवकरच मोहिम उघणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी दिला. जनतेसाठी अन्न सुरक्षा महत्वाची असून त्यासाठी लोकचळवळ उभी राहण्याची आवश्यकता असून शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासूनच अन्न सुरक्षेबाबत मुलांना शिक्षण द्यावे, असा प्रस्ताव लवकरच शिक्षण विभागास सादर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या आयडिया एक्सचेंज कार्यक्रमात बोलताना मुंढे यांनी तरुण पिढीच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आहारपूरक उत्पादनांविरोधात धडक कारवाई सुरु करण्याचा इशारा दिला.या आहारपुरक उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्यास घातक घटक मिसळले जात आहेत. तसेच त्याच्या विक्री, वापराबाबतही मोठ्याप्रमाणात अनागोंदी सुरु असून त्याबाबतची नियमावली जाहीर करुन आरोग्यास घातक आहारपुरक उत्पादनांवर आणि उत्पादकांवर कठोर कारवाई करणार इशारा मुंढे यांनी दिला. अशाचप्र कारे भेसळयुक्त मद्याविरोधातही मोहीम सुरु करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्याचप्रमाणे अन्न व औषधांमध्ये भेसळ करणाऱ्यांना आणि त्यांची जाहीरातबाजी करणाऱ्यांना कायद्याची जरब बसविण्यासाठी अन्न सुुरक्षा आणि मानक कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. यात प्रामुख्याने दंड आणि शिक्षेत वाढ करण्याची गरज असून प्रसिद्धी करणाऱ्यांनाही कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी राज्य सरकारला सुधारणा प्रस्ताव पाठविणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

लोकांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांना चांगले शुद्ध अन्न, औषधे मिळावीत यासाठी आपण केवळ अन्न सुुरक्षा आणि मानक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. मात्र त्यामुळे अनेक उद्योग क्षेत्रे नाराज झाली आहेत. मात्र लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कुणाचीही आपल्याला पर्वा नाही, आपल्याला केवळ लोकांच्या आरोग्याची काळजी असल्याचे सांगून मुंढे म्हणाले, अन्न सुुरक्षा आणि मानक कायद्याची सन २०११ पासून अंमलबजावणी सुरु झाली असली तरी त्याचा प्रभाव दिसत नव्हता. आपण या कायद्याती तरतूदींचे पालन करण्यासाठी हाॅटेल, दूध, औषधे उत्पादकांना बंधनकारक केले. केवळ गणेशोत्सावासाठीच नव्हे तर सर्वच सणांसाठी प्रसादाबाबत नियम लागू करण्यात आले असून गणेशोत्सावात तब्बल ५० टन भेसळयुक्त मावा जप्त करण्यात आला. भक्तांना शुद्ध प्रसाद मिळावा यासाठीच हा निर्णय होता असा दावाही त्यांनी केला.

अन्न व औषध प्रशासनाच्या कक्षेत तब्बल १३ लाख आस्थापना असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ८५० अधिकारी- कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असली तरी प्रत्यक्षात ३५० अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आयुक्तालयाचा कारभार चालू आहे. मात्र ही व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला असून प्रत्येक जिह्यात प्रयोगशाळा सुरु करण्याचे नियोजन केले जात आहे. सध्या उपलब्ध प्रयोगशाळांमध्ये अधिकाऱ्यांनी गोळा केलेल्या नमुन्यांचे परिक्षण होत असून तीन महिन्यात विविध आस्थापनामधून गोळा करण्यात आलेल्या ३७ हजार नमुन्यांपैकी केवळ सुमारे ४-५ हजार अहवाल येणे बाकी आहे. विशेष म्हणजे परिक्षण करण्यात आलेल्या ३२ हजार नमुन्यांपैकी १३ हजार नमुन्यात भेसळ, निकृष्टपणा आढळून आला असून १२ हजार हाॅटेलवाल्यांवरही कारवाई करण्यात आली असून त्यातील ५० टक्के हाॅटेलवाले कायदा माहित असूनही जाणून बूजून त्याचे पालन करीत नसून कारवाईपासून वाचण्यासाठी खोटा अपप्रचार करीत असल्याचा दावाही मुंढे यांनी केला.

विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेवढ्या आस्थापनांवर कारवाई केली आहे, त्यापैकी केवळ १२५ आस्थापनांनी आपल्याकडे अपिल केले असून सुनावणीअंंती निकाली काढण्यात आली आहेत. काही अहवालांना विलंब लागत असल्याने हे परिक्षण अहवाल शिल्लक आहेत. मात्र विभागाची आणि परिक्षणाची गती वाढविण्यात आली आहे. खाजगी प्रयोगशाळांवरही विभागाचे नियंत्रण असून कंपन्या, उत्पादक त्यांच्याकडे उत्पादनाचे परिक्षण करुन घेतात, त्यामुळे यापढे राज्य सरकारच्या प्रयोगशाळा आणि खाजगी प्रयोगशाळा यांच्या परिक्षण अहवालात तफावत आल्यास सबंधित प्रयोगशाळेवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. तसेच विभागाच्या आधुनिकीकरणारावर आणि गतीमान कारभारासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरावर अधिक भर देण्यात आल्याचेही मुंढे यांनी सांगितले.

अन्न, औषध सुरक्षेबाबत राज्यात सुरु झालेल्या मोहिमेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून केंद्राने ॲनालाॅक पनीवर बंदी घातली आहे. शालेय पोषण आहार, मध्यान्ह भोजन याबाबतही आदेश निघाले आहेत. तसेच अमेरिका आणि जपानच्या अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली भेट घेऊन चर्चा केली असून येत्या काळात जागतिक दर्जाचे अन्न व औषध आयुक्तालयाचे पोर्टल विसकित करणार असल्याचेही मुंढे यांनी सांगितले.