मुंबई : बेकायदेशीर औषधांची विक्री व उत्पादन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोहीम हाती घेतली असताना आता तपशील नसलेली सौंदर्यप्रसाधने तसेच भ्रामक दावे व विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध राज्यभरात कठोर कारवाई हाती घेतली आहे. त्यानुसार मुंबई व साताऱ्यामध्ये केलेल्या कारवाईत तब्बल ३४ लाख ६१ हजार किमतीचा माल जप्त करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासनला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १२ जून रोजी सातारा जिल्ह्यातील कराडमधील मे. राजलक्ष्मी टेलीकम्युनिकेशन या कंपनीची तपासणी करण्यात आली. या तपासणीत विविध सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी साठविलेली आढळून आली. या उत्पादनांची पडताळणी केली असता अनेक उत्पादनांच्या बाह्य कार्टनवर बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक नमूद असताना आतील बाटल्यांवरील लेबलवर बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक तसेच उत्पादकाचे नाव नमूद नसल्याचे निदर्शनास आले.

काही उत्पादनांवर उत्पादन परवाना क्रमांक नमूद असला तरी उत्पादकाची माहिती नव्हती. त्यामुळे संबंधित सौंदर्यप्रसाधने प्रथमदर्शनी नियमबाह्य असल्याचे आढळून आले. या कारवाईत २९ लाख ४५ हजार ३७५ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.१३ जून रोजी मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केट येथील मेसर्स ब्युटी सेंटर या आस्थापनावर केलेल्या कारवाईत काही सौंदर्य प्रसाधन उत्पादनांवर आवश्यक वैधानिक तपशीलांचा अभाव असल्याचे आढळून आले.

यामध्ये नैसर्गिक स्तनवृद्धीसाठी डेली डिव्हाईन अरोमाथेरपी आवश्यक तेल मिश्रण, नैसर्गिक नितंबवृद्धीसाठी डेली डिव्हाईन अरोमाथेरपी आवश्यक तेल मिश्रण, नैसर्गिक तीव्र चरबी कमी करण्यासाठी डेली डिव्हाईन अरोमाथेरपी आवश्यक तेल मिश्रण, फ्लोरा एसेन्शियल हेरिटेज ब्लेंड – बेरी समृद्ध मिश्रण, फ्लोरा एसेन्शियल हेरिटेज ब्लेंड – उपचारात्मक स्पर्श मिश्रण, फ्लोरा एसेन्शियल हेरिटेज ब्लेंड – शुद्ध तेजस्विता मिश्रण या उत्पादनांचा समावेश आहे. या उत्पादनांवर बॅच क्रमांक, परवाना क्रमांक तसेच उत्पादकाची माहिती अपुरी असल्याने व भ्रामक दावे असल्याने १ लाख २० हजार १५२ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

क्रॉफर्ड मार्केटप्रमाणे मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील मेसर्स रेडियंट क्रिएशन्स या संस्थेची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आवश्यक वैध परवान्याविना औषधे व सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन व विक्रीसाठी साठा ठेवण्यात आल्याचे आढळून आले. तसेच उत्पादन प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री व कच्चा मालही तेथे उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात औषधे, सौंदर्यप्रसाधने, कच्चा माल तसेच उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री असा ३ लाख ९६ हजार ८३० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

संबंधितांविरुद्ध औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० आणि त्याअंतर्गत नियमांनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. भ्रामक, निकृष्ट दर्जाची अथवा विनापरवाना उत्पादने तयार करणे, साठवणे किंवा विक्री करणे याविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहील. ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि सुरक्षित उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करणे हेच प्रशासनाचे प्रमुख ध्येय आहे. – तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन