मुंबई : खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई हाती घेतल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली’ या आयुर्वेदिक उत्पादनांवर कारवाई केली. राज्यातील ७ जिल्ह्यांतील १२ ‘पंतजली’ आयुर्वेदिक औषधांच्या केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीची ‘पतंजली’ची औषधे जप्त करण्यात आली.

भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्री विरोधात एफडीए कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल, असा स्पष्ट इशारा देत तुकाराम मुंढे यांनी राज्यातील ७ जिल्ह्यांतील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनामध्ये धडक कारवाई करून ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीची आयुर्वेदिक औषधांचा साठा जप्त केला.

‘औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४’चा भंग केल्याप्रकरणी योगगुरू रामदेव बाबा यांच्या उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मे. दिव्या फार्मसी या ‘पंतजली’ ब्रॅण्डअंतर्गत औषधांचे उत्पादन करणाऱ्या नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, कोकण, अमरावती, छत्रपती संभाजी नगर येथील आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये तब्बल ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीची आयुर्वेदिक औषधे जप्त करण्यात आली.

या कारवाईदरम्यान नागपूर येथील आस्थापनामधून ७ लाख २६ हजार ७५५ रुपये, नाशिकमधून, ७ लाख १० हजार ९४५ रुपये, पुणे येथून १४ लाख ६८ हजार ९८१, मुंबईतून १ लाख ८५ हजार ६०० रुपये, कोकण विभागातून १८ लाख ५८ हजार, अमरावतीमधून १ लाख ४२ हजार २२९ रुपये, छत्रपती संभाजीनगरमधून ४८ हजार ७१८ रुपयांचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच पुणे विभागामध्ये केलेल्या कारवाईमध्ये दोन ॲलोपॅथी बनावट औषधांचा तब्बल २१ लाख ८३ हजार ४२८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

नागरिकांना आवाहन व तक्रार निवारण यंत्रणा

अवैध औषध विक्री, औषधांमधील भेसळ किंवा फसव्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे. तसेच कुठल्याही औषधांवर असलेल्या भ्रामक जाहिरातींवर विश्वास न ठेवता स्वतःच्या मनाने औषधांचे सेवन करू नये. यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद््भवू शकतात, त्यामुळे अशा उत्पादनाबाबत प्रशासनाकडे तक्रार करावी, असेही एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तक्रार कशी करावी ?

औषधांच्या दर्जाबाबत शंका असल्यास किंवा अवैध साठवणुकीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित एफडीएकडे तक्रार करावी. तक्रार करताना आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, तसेच संशयित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि औषधाचे नाव स्पष्टपणे नमूद करावे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींची अत्यंत गोपनीयतेने पडताळणी करून तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’ व इतर अनुषंगिक कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढे थेट कायदेशीर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. – तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन