मुंबई: राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपल्याच विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत सहआयुक्त दर्जाच्या नाशिकच्या पाच बड्या अधिकाऱ्यांना निलंबीत केले आहे. या अधिकाऱ्यांनी २५२ मेट्रिक टन सुपारी नष्ट केल्याचे खोटे पंचनामे करून ती सुपारी पुन्हा बाजारात विक्रीस आणल्याचा विभागाला संशय आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे निकृष्ट दर्जाची सुपारी अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये जप्त केली होती. सदर सुपारी खाण्यासाठी धोकादायक असल्याने ती नष्ट करावी, असे न्यायालयाने मार्च २०२५ मध्ये विभागाला आदेश दिले होते. या निकृष्ट सुपारीची ३५० पोती होती. ती सुपारी जाळून टाकल्याचे खोटे पंचनामे या पाच अधिकाऱ्यांनी तयार केले होते.

तुकाराम मुंढे या विभागाच्या आयुक्तपदी आल्यानंतर त्यांना सचिन खैरनार या मालेगावच्या युवकाची तक्रार हाती आली. मुंढे यांनी या प्रकरणाची फाईल मागवून घेतली. त्यामध्ये ११ ट्रकचा वापर करून आठ तासात २५२ टन सुपारी जाळून नष्ट केल्याची कागदपत्रे होती. मुंढे यांना या प्रकरणाची शंका आली. एका ट्रकमध्ये सुमारे ४ टन सुपारी वाहता येते. ११ ट्रकच्या एका फेरीत ४४ टन सुपारी वाहून नेता येते. त्यामुळे यात काळेबेरे असल्याचा संशय बळावला. सदर प्रकरणाच्या तपासासाठी विधि विभागाची समिती करण्यात आली होती. त्यामध्ये सगळीकडे एकाच ट्रकचे क्रमांक आणि पंचनाम्यातील साक्षीदार एकच आढळून आले. एकच ट्रक व एकच साक्षीदार एकाच वेळी अनेक ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचे बिंग फुटले.

अनविनाश दाभाडे, अमित रासकर, गोपाळ कासार, योगेश देशमुख हे नाशिक विभागातील चार अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त आणि सुवर्णा महाजन या धुळे येथील सहायक आयुक्त यांच्या निलंबनाची फाईल मुंढे यांनी सचिवांकडे पाठवली. अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाचा अधिकचा कार्यभार आहे. या विभागाचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवाळ आहेत. सदर फाईलवर निर्णय होत नव्हता. प्रकरण दाबले जाण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाला माध्यमात वाचा फुटली आणि अखेर गुरुवारी रात्री मंत्री झिरवाळ यांनी पाच अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या आदेशावर सही केली.

१० कोटींची सुपारी :

अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेला निकृष्ट साठा नष्ट करण्याबाबत ‘अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण’, दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचना आहेत. मात्र त्याचे उल्लंघन करत या पाच अधिकाऱ्यांनी निकृष्ट सुपारी पुन्हा बाजारात विक्रीला आणल्याचा संशय आहे. या सुपारीची किंमत १० कोटी रुपये आहे. या पाच अधिकाऱ्यांची आता विभागीय चौकशी होणार आहे. तसेच त्यामध्ये ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायमची बडतर्फी ओढावू शकते.