मुंबई: अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुट्या खाद्यतेल विक्रीवर आणलेल्या बंदीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बंदीला स्थगिती देत समिती नेमण्याची घोषणा केली. खाद्यतेल विक्री करणाऱ्या पारंपरिक व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या खाद्यतेल विक्रीबाबत धोरण निश्चित करण्यासाठी सरकारने ‘सुट्टे खाद्यतेल विक्री समन्वय व धोरण समिती’ गठित केली आहे. ही समिती एका महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुट्या खाद्यतेल विक्रीस विशेष बाब म्हणून एक वर्षाची मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे अन्न व औषध प्रशासनाचा प्रचलित कायदा आणि पारंपरिक व्यावसायिक यांच्यात समन्वय साधण्यासाठी उपाययोजना सुचविणे, तसेच पारंपरिक व्यवसाय टिकविण्यासाठी विक्रेत्यांना शासनाकडून कोणती मदत करता येईल, याबाबत धोरण निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे ठरले होते. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या आधारे ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे सह आयुक्त (अन्न) समितीचे अध्यक्ष असतील. अमरावतीचे सह आयुक्त (अन्न), खाद्यतेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर खाद्यतेल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष, पारंपरिक तेली समाजाचे प्रतिनिधी आणि अन्न तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयातील सहायक आयुक्त (अन्न) हे सदस्य सचिव असतील.
अध्यक्षांच्या मान्यतेने अन्य अधिकारी आणि तज्ज्ञांना निमंत्रित सदस्य म्हणून सहभागी करून घेता येणार आहे. ही समिती सुट्या खाद्यतेल विक्रीसंदर्भातील अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि त्याअंतर्गत नियम व विनियमांचा अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर पारंपरिक व्यावसायिकांना प्रत्यक्ष व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन कायदेशीर तरतुदी आणि व्यावसायिकांचे हित यांच्यात समन्वय साधणाऱ्या व्यवहार्य उपाययोजना सुचविणार आहे.
पारंपरिक तेल विक्रेत्यांचा व्यवसाय टिकविण्यासाठी शासनाने कोणत्या स्वरूपात मदत करावी, याबाबतही समिती धोरणात्मक शिफारशी करणार आहे. दरम्यान, ही समिती केवळ सल्लागार स्वरूपाची असून अन्न सुरक्षा कायदा आणि नियमांबाहेर जाऊन कोणतीही सूट देण्याचे अधिकार समितीला नसतील, असे याविषयी अन्न व औषध प्रशासनाने काढलेल्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. या समितीच्या शिफारशींवर पारंपरिक खाद्यतेल विक्रेत्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळतो का आणि सुट्या खाद्यतेल विक्रीबाबतच्या निर्बंधांमध्ये काय बदल होतात, याकडे राज्यातील व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
