मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मागील काही दिवसांमध्ये अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यातच एफडीएच्या आयुक्तपदी रुजू होताच तुकाराम मुंढे यांनी ही कारवाई अधिक तीव्र केली. त्यानुसार २५ ते २७ या दोन दिवसांमध्ये राबविलेल्या मोहिमेमध्ये तब्बल १९ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये १ लाख ७३ हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. मुंबईमधील वांद्रे पूर्व, अंधेरी पश्चिम, कांदिवली, धारावी, विक्रोळी (पश्चिम), परेल, चेंबूर, सांताक्रुझ (पश्चिम), भेंडीबाजार, गोरेगाव, मुलुंड व अँटॉप हिल येथे करवाई करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी २५ ते २७ मे या कालावधीत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली. या मोहिमेंतर्गत केलेल्या कारवाईत १९ आस्थापनांमध्ये १ लाख ७३ हजार १२ रुपये किमंतीचे प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळला. याप्रकरणी १४ पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करून १९ जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबईतील वांद्रे पूर्व, अंधेरी पश्चिम, कांदिवली, धारावी, विक्रोळी (पश्चिम), परेल, चेंबूर, सांताक्रुझ (पश्चिम), भेंडीबाजार, गोरेगाव, मुलुंड व अँटॉप हिल येथे करण्यात आली.

नूडल्स व बुंदी लाडू विक्रेत्यांवर कारवाई

धारावी येथील ड्रॅगन नुडल्स या आस्थापनेमध्ये उत्पादित होणाऱ्या नुडल्सच्या पॅकिंगवर नियमाप्रमाणे आवरणावरील चिठ्ठी लावण्यात आली नसल्याचे आढळून आले आहे. यामध्ये अन्नपदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन १०० किलाे नूडल्स जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या नूडल्सची किंमत १० हजार रुपये

होती. वांद्रे पश्चिम येथील मे. अश्विनी स्वीटस ॲंड फरसाण या आस्थापनामध्ये अन्न सुरक्षा कायदा, नियमांर्तगत परिशिष्ट ४ ची अंमलबजावनी न केल्याने, तसेच कलम २६ व २७ चे उल्लंघन केल्याने व नियमाप्रमाणे अन्नपदार्थाच्या कोणत्याही वेष्टनावर चिठ्ठी लावण्यात आली नसल्याचे व उत्पादन दिनांक व कालबाह्यता तारीख नसल्यामुळे बुंदीच्या लाडवाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तसेच ४ हजार ६५० रुपये किमंतीचे ३१ किलो बुंदीच्या लाडवाचा साठा जप्त करण्यात आला.

पामोलिन व कापसाच्या बियांचे तेल जप्त

असल्फा येथील मे. दिप्ती ऑईल ट्रेडिंग या कंपनीमध्ये रिफाईंन्ड पामोलीन तेल या अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी पुनर्वापर केलेल्या डब्यांचा वापर करण्यात आल्याचे आढळून आले. जुन्या डब्यांचा वापर करणे हे एफएसएसएमधील पॅकेजिंग नियमांतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे या कंपनीतून ७४८ किलो व १ लाख १८ हजार १८४ रुपये किंमतीचे रिफाईंड पामोलिन तेल जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे कापसाच्या बियांचे तेल खुल्या पद्धतीने विक्री करीत असल्याचे आढळून आले. हे तेल खुल्या पद्धतीने विकणे कायद्याने प्रतिबंधित आहे. या कारवाईत ३२ हजार ४० रुपये किमतीचे १७८ किलो कापसाच्या बियांचे तेल जप्त करण्यात आले. या तेलाचे काही नमूने विश्लेषणासाठी घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या सर्व अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणाकरीता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यांतर्गत आस्थापना मालकांविरोधात पुढील कारवाई करण्यात येईल, असे एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.