मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार आणि प्रशासकीय कामातील दिरंगाईच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कठोर आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्याची मागणी वॉचडॉग फाउंडेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात संस्थेचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला सविस्तर निवेदन पाठविले आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून महानगरपालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक आहे. मात्र, महापालिका प्रशासनावर भ्रष्टाचार, पक्षपात, सार्वजनिक कंत्राटांमधील अनियमितता, अनधिकृत बांधकामे, नागरी परवानग्यांमधील गैरव्यवहार, सार्वजनिक निधीचा गैरवापर आणि प्रशासकीय अकार्यक्षमता यांसारखे गंभीर आरोप सातत्याने होत असल्याचा दावा संस्थेने केला आहे. या सर्व बाबींमुळे महापालिका प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास कमी झाला असून मूलभूत नागरी सुविधा मिळविण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेत व्यापक संस्थात्मक सुधारणा करण्यासाठी स्वतंत्र, निर्भय आणि तडजोड न करणाऱ्या प्रशासकीय नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.

सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले तुकाराम मुंढे यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी विविध पदांवर काम करताना पारदर्शकता, प्रशासकीय जबाबदारी आणि जनहिताला प्राधान्य दिले असून, भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या कडाक शिस्तीमुळे अनेक विभागातील गैरप्रकार नियंत्रणात आले आहेत. त्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांना आळा घालणे, सार्वजनिक निधीचा अपव्यय रोखणे, प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी तुकाराम मुंढे यांचे नेतृत्व प्रभावी ठरू शकते, असा विश्वास वॉचडॉग फाउंडेशनने व्यक्त केला आहे.

तसेच, काही भ्रष्ट अधिकारी, मध्यस्थ आणि कंत्राटदारांसाठीच महापालिका काम करत असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कठोर आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यास सकारात्मक चित्र दिसण्याची अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे.