मुंबई : बनावट वैश्विक अपंग ओळखपत्र (यूडीआयडी) घेऊन राज्य परिवहन (एसटी) प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे. अपंग नसतानाही बनावट यूडीआयडी घेऊन प्रवास करण्याची धरपकड करून गुन्हा दाखल केला जाईल. याबाबत दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना पत्र पाठवले आहे.
सोलापुरात बनावट अपंग ओळखपत्राचे प्रकरण समोर आल्यानंतर, तुकाराम मुंढे यांनी सर्व जिल्ह्यांत वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी व पडताळणी करण्याचे कडक आदेश दिले आहेत. तसेच मुंढे यांनी बनावट अपंग ओळखपत्राद्वारे एसटी महामंडळातील सवलती लाटणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महामंडळाला पत्र पाठवले आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ तसेच शासनस्तरावर वेळोवेळी निर्गमित आदेशानुसार राज्य परिवहन महामंडळामार्फत अपंग व्यक्तींना प्रवास सवलतीचा लाभ देण्यात येत आहे. या सवलतीचा लाभ घेणाऱ्या अपंग व्यक्तीची संख्या मोठी असून, या सवलतीचा लाभ केवळ पात्र अपंग व्यक्तींनाच मिळावा यादृष्टीने पडताळणी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने, राज्य परिवहन महामंडळाने दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या अपंग व्यक्तींच्या दिव्यांगत्व ओळखपत्राची तपासणी वाहक / तिकीट तपासनीसांनी यूडीआयडी विभागाच्या मोबाइल ॲपवरून करावी. या मोबाइल ॲपमध्ये अपंग व्यक्तीच्या वैश्विक अपंग ओळखपत्राचा क्रमांक व जन्म तारीख नमूद करून, वैश्विक अपंग ओळखपत्र यूडीआयडी वैधतेची पडताळणी करावी.
पडताळणी केल्यानंतर ओळखपत्र वैध असल्यास संबंधित प्रवाशाला प्रवास सवलतीचा लाभ द्यावा. तथापि, ओळखपत्र बनावट असल्यास, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम-९१ नुसार संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करावा. तसेच, हे ओळखपत्र जप्त करून त्याबाबत दिव्यांग कल्याण विभागाला कळवावे, असे मुंढे यांनी महामंडळाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
एसटी महामंडळाकडून अपंग व्यक्तींना प्रवास सवलतीचा लाभ दिला जातो. या सवलतीचा लाभ घेणाऱ्या अपंग व्यक्तींची संख्या मोठी आहे. परंतु, पात्र अपंग व्यक्तींना हा लाभ घेता यावा, यासाठी यूडीआयडीची तपासणी केली जाणार आहे. याबाबत एसटी महामंडळाचे वाहतूक खात्याच्या महाव्यवस्थापकांनी प्रादेशिक व्यवस्थापक, विभाग नियंत्रकांना सूचना दिल्या आहेत.
एसटीतील सर्व वाहकांना, पर्यवेक्षकीय कर्मचारी आणि मार्ग तपासणी कर्मचाऱ्यांना मोबाइलमध्ये यूडीआयडी विभागाचे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर कर्तव्यावर असताना, प्रत्येक अपंग प्रवाशाच्या यूडीआयडी तपासणी करावी, बनावट ओळखपत्र आढळल्यास ते जप्त करून आगारात जमा करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
