मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. राज्यामध्ये २५ ते ३१ मे या कालावधीत २०३ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्य १३० आस्थापनांची तपासणी करून ८६ आस्थापनांना टाळे (सील) ठोकण्यात आले. तसेच १०२ जणांना अटक करण्यात आली. खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या ७३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईमध्ये राज्यभरातून १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
राज्यातील अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अधिकाऱ्यांनी २५ मे व ३१ मे २०२६ रोजी मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या विभागात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध कारवाई केली. गुटखा व पानमसाल्यांची विक्री केल्याप्रकरणी राज्यभरामध्ये ८६ आस्थापना टाळेबंद (सील) करून १०२ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये कोकण विभागात तब्बल ३९ आस्थापना टाळेबंद करून ४६ जणांना अटक करण्यात आली. मुंबईमध्ये २२ आस्थापना टाळेबंद करून २३ जणांना अटक केली. पुण्यात १३ आस्थापना टाळेबंद करून १३ जणांना, नाशिकमध्ये ३ आस्थापना ठालेबंद करून ५ जणांना, छत्रपती संभाजीनगरमध्ये ५ आस्थापना टाळेबंद करून ८ जणांना, अमरावतीमध्ये ३ आस्थापना टाळेबंद करून ५ जणांना, तसेच नागपूर विभागात एका आस्थापनांवर कारवाई करून दोघांना अटक करण्यात आली. या सर्व ठिकणांवरून ३४ लाख ५ हजार ४८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्याचप्रमाणे २५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, भंडारा, जालना, बीड व नांदेड, परभणी, सोलापूर, छत्रपती सांभाजीनगर, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, जळगाव, रायगड, धुळे इत्यादी जिल्ह्यांमध्ये संशयित कमी दर्जा किंवा असुरक्षित अन्नपदार्थ, तसेच अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया आणि दिशाभूल करणारे वेष्टन यावर कठोर कारवाई करण्यात आली. यावेळी ७३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून आंबे, बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, दूध व दुग्ध्जन्न पदार्थ, गुळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईसक्रिम, कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाल्याचे पदार्थ, शेंगदाणा चिक्की इत्यादी अन्नपदार्थ, तसेच भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अन्नपदार्थाचा सुमारे १ कोटी २४ लाख २३ हजार ६२९ रुपये किमतीचा ९० हजार ६३९ किलो इतका साठा जप्त करण्यात आला. विश्लेषणासाठी अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
