मुंबई – प्रेम या विषयावर अनेक मराठी-हिंदी-भारतीय चित्रपट आहेत. १९७० च्या दशकापासून ते आजच्या काळापर्यंतच्या तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व असलेला “तुला पाहता’ हा नवा मराठी चित्रपट १० जुलै राेजी प्रदर्शित होणार आहे. ज्येष्ठ अभिनेता सतीश पुळेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे हे अनुभवी कलावंत प्रथमच एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर मानसी पाटील आणि गायक म्हणून प्रसिद्ध असलेला नचिकेत लेले या नव्या दमाच्या कलावंतांची नवीन जोडी या चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.
या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच समाजमाध्यमांवर प्रदर्शित करण्यात आले. ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान या निर्मात्या असून कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन अशी बहुआयामी जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्निल परजाणे, आकाश शिंदे अशी अन्य कलावंत मंडळी आहेत.
