मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या कथित आत्महत्येचा तपास योग्य दिशेने केला जात आहे ना? अभिनेता शिझान खान याने तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे पुरावे आहेत का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने गुरुवारी पोलिसांना केली. तसेच तुनिषा हिच्या आईच्या जबाबतून हे स्पष्ट होत नसल्याने शिझान याने तुनिषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे पुरावे किंवा हेतू शोधावा लागेल, अशी टिप्पणीही केली.
प्रकरणाबाबतची पोलिसांची नोंदवही वाचल्यानंतर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सरकारी वकील अरूणा पै यांच्याकडे उपरोक्त विचारणा केली. त्याचवेळी शिझान याने जामिनासाठी स्वतंत्र याचिका केल्याने अंतरिम जामिनावर सुटका करण्याच्या त्याने केलेल्या मागणीबाबत न्यायालयाने तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला.
हेही वाचा >>> माथेरानच्या मिनी ट्रेनचा प्रवासही वातानुकूलित; वातानुकूलित सलून कोचची जोडणी, भाडे दर मात्र अव्वाच्यासव्वा
तुनिषा हिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान याने त्याच्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जामिनासाठी स्वतंत्र याचिका करण्यासह शिझान याने गुन्हा रद्द करण्यासाठी स्वतंत्र याचिका केली आहे. त्यात त्याने याचिका निकाली निघेपर्यंत अंतरिम जामिनावर सुटका करण्याची मागणी केली आहे.
त्याच्या या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱयांतील चित्रणानुसार, घटनेच्या दिवशी तुनिषा हिची सुरुवातीची वागणूक सामान्य होती आणि ती आनंदी दिसत होती. परंतु चित्रिकरण स्थळावरील शिझान याच्या खोलीतून ती निराश चेहऱ्याने बाहेर पडल्याचे दिसत आहे, असे पोलिसांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. तुनिषा, शिझान आणि त्यांच्या एका मित्राचा भ्रमणध्वनी न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहितीही न्यायालयाला देण्यात आली. त्यावर पोलिसांनी तपास सुरू ठेवावा. परंतु शिझान याच्या कोठडीची आवश्यकता नाही, असे त्याचे वकील धीरज मिरजकर यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना प्रकरणाच्या प्रगतीची नोंदवही न्यायालयात सादर करण्यास सांगितले. ती वाचल्यानंतर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत आहे का ? अशी विचारणा करताना शिझान याने तुनिषाला आत्महत्येसाठी नेमके कशापद्धतीने प्रवृत्त केले हे पाहावे लागेल. प्रकरणात तक्रारदार असलेल्या तुनिषा हिच्या आईच्या जबाबावरून ही बाब स्पष्ट होत नसल्यातडे न्यायालयाने लक्ष वेधले. त्याचवेळी शिझान याने जामिनासाठी स्वतंत्र याचिका केल्याने आधी त्यावर सुनावणी होऊ दे असे स्पष्ट केले.