पनवेल-कर्जत रेल्वेमार्गावर बोगदे

पनवेल ते कर्जत नवीन दुहेरी उपनगरीय रेल्वेमार्गावर तीन बोगदे उभारण्यात येणार असून यातील एक बोगदा अडीच किलोमीटरचा असणार आहे.

नवीन मार्गावर तीन बोगद्यांसाठी निविदा काढणार; २९ हेक्टर खासगी भूसंपादन बाकी

मुंबई : पनवेल ते कर्जत नवीन दुहेरी उपनगरीय रेल्वेमार्गावर तीन बोगदे उभारण्यात येणार असून यातील एक बोगदा अडीच किलोमीटरचा असणार आहे. यासाठी निविदा काढली जाईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातील (एमआरव्हीसी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हार्बर आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणखी एक पर्याय ठरू शकणारी पनवेल ते कर्जत लोकलसेवा या मार्गावर सुरू होण्यासाठी चार वर्षे प्रतीक्षा करावी लागणार असून प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे.

पनवेल ते कर्जत सध्या एकच मार्गिका असून लांब पल्ल्याच्या गाडय़ा किंवा मालवाहतुकीसाठी त्याचा वापर होत असतो. कर्जत आणि पनवेलमधील प्रवासासाठी व्हाया ठाणे किंवा कुर्ला मार्गे लोकलने जावे लागते. अन्यथा रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो. मात्र त्यात बराच वेळ जातो. पनवेल ते कर्जत अशी थेट लोकल सुरू झाल्यास त्याचा फायदा अनेक प्रवाशांना मिळू शकतो. त्यासाठी येथे नवीन उपनगरीय मार्गिका बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र करोनामुळे प्रकल्पाची निविदा प्रक्रि या व प्रत्यक्ष कामे थांबली होती. जानेवारी २०२१ नंतर या कामांना सुरुवातही झाली आहे. दुहेरी मार्ग २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु करोनामुळे प्रकल्पाच्या कामाला विलंब झाला व तो पूर्ण होण्यासही आणखी काही कालावधी लागेल. प्रकल्पातील दुहेरी मार्गाचे काम करण्यासाठी सरकारी, खासगी, वनाची अशी १०१ हेक्टर जमीन लागणार आहे. यातील फक्त २९ हेक्टर भूसंपादन बाकी असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

या मार्गात उन्नत मार्गिका, बोगदा, फलाट, पादचारीपूल इत्यादी कामे करावी लागणार आहेत. आतापर्यंत पादचारी पुलांसह अन्य कामांना सुरुवात झाली आहे. पुलांच्या कामांसाठी पाया खोदण्याचे काम सुरू के ल्याचे सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे या मार्गात तीन बोगदे असणार आहेत. एक बोगदा २.६० किलोमीटर लांबीचा असेल, तर दुसरा बोगदा २५० मीटर आणि तिसरा बोगदाही तेवढय़ाच लांबीचा असणार आहे. या कामासाठी एक ते दोन आठवडय़ात निविदाही काढली जाणार आहे. याशिवाय पनवेल येथील मार्गिके वरून एक छोटी उन्नत मार्गिकाही उभारली जाईल. अशाच प्रकारचे काम कर्जत दिशेकडूनही केले जाणार आहे.

टप्प्याटप्प्यांत बोगदे

सध्या पनवेल ते कर्जत दरम्यान दोन मार्गिका आहेत. या मार्गिके दरम्यानही एक बोगदा आहे. त्या बोगद्यालगतच नवीन मार्गिकेवर टप्प्याटप्प्यांत बोगदे बनतील. नवीन मार्गिके त एकू ण तीन बोगदे होणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tunnels on panvel karjat railway line mumbai ssh