मुंबई: मुंबईमधील ग्रॅन्ट रोड येथील ऑगस्ट क्रांती मैदानावर शनिवारी दुपारी ३:३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतर मुंबईत राजकीय कलगीतुरा रंगला.आंदोलनाची हाक देणारे महात्मा गांधी यांचे पणतू तथा ‘हम भारत के लोग’ संघटनेचे अध्यक्ष तुषार गांधी आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या नेत्या ॲड. साम्या कोरडे यांच्यासह सुमारे २०० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मकरित्या ताब्यात घेतले. या कारवाईच्या निषेधार्थ आणि तुषार गांधी यांच्या तात्काळ सुटकेच्या मागणीसाठी संध्याकाळी अंधेरी येथील डी. एन. नगर पोलीस ठाण्याबाहेर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
आंदोलनाची पूर्वकल्पना मिळाल्यामुळे मुंबई पोलिसांनी दक्षिण आणि पश्चिम प्रादेशिक विभागाने शनिवारी सकाळपासूनच ग्रँड रोड परिसरातील ऑगस्ट क्रांती मैदानात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. मैदानाच्या चारही बाजूंना लोखंडी रस्ता रोधक उभारण्यात आले असून राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक आणि स्थानिक पोलिसांचे शेकडो जवान तैनात करण्यात आले होते. मैदानावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कसून चौकशी करण्यात येत होती. कोणत्याही जाहीर सभेला किंवा आंदोलनाला सक्त मज्जाव करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी मुंबईतून सीजेपी समर्थक, डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या सुमारे २०० हून अधिक जणांना दुपारी ३:३० पूर्वीच ताब्यात घेतण्यात आले होते.
आंदोलनात सहभागी होण्यासाठी वांद्रे येथून तुषार गांधी निघाल्यानंतर सांताक्रूझ पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. त्यांना सुरुवातीला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आणि नंतर अंधेरी येथील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात हलवण्यात आले. तसेच तुषार गांधी यांच्या कन्या कस्तुरी गांधी यांनाही स्थानबद्ध करण्यात आले. या बेकायदेशीर अटकेची माहिती समजताच महाविकास आघाडीमधील शिवसेनेचे (ठाकरे) नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने डी. एन. नगर पोलीस ठाण्याबाहेर धडकले. खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे नेते अनिल परब, आमदार पांडुरंग सकपाळ, आमदार हारून खान, आमदार अनंत नर तसेच कॉंग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष मोहसिन हैदर, उत्तर-पश्चिम जिल्हा अध्यक्षा भावना जैन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
“तुषार गांधी जोपर्यंत मुक्त होत नाहीत, तोपर्यंत आमचे पोलीस ठाण्याबाहेरचे धरणे आंदोलन सुरूच राहील, ” असा आक्रमक पवित्रा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतल्यामुळे पोलीस प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला. दरम्यान, तुषार गांधी शांतताप्रिय आणि निरपराध असताना त्यांना अचानक पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांना तातडीने औषधोपचाराची व औषधांची गरज आहे, असे कस्तुरी गांधी यांनी सांगितले.
पुरोगामी विद्यार्थी संघटना आणि छात्रभारतीच्या नेत्या ॲड. साम्या कोरडे यांनाही पोलिसांनी आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी ताब्यात घेतले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांना व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांवर गदा आणली जात असल्याचा आरोप करत विद्यार्थी संघटनांनी पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारी गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी ज्युबिली मिल, तेजपाल रोड आणि लगतच्या जोड रस्त्यांवरील वाहनांची वाहतूक तात्पुरती थांबवून ती लॅमिंग्टन रोड व नाना चौकाकडे वळवण्यात आली.महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांनी डी. एन. नगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिल्याने अंधेरी लिंक रोडवरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी तातडीने पर्यायी मार्गांने वाहतूक वळवली.
