मुंबई : अभिनेता तुषार कपूरला पाच कोटी रुपयांची खंडणी मागणारा धमकीचा दूरध्वनी आल्याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य ‘हॅरी बॉक्सर’ असल्याचे सांगितले. मात्र, गुन्हे शाखेच्या तांत्रिक पथकाने धमकीच्या दूरध्वनीतील आवाजाची उपलब्ध अधिकृत ध्वनिमुद्रणांशी तुलना केली असता दोन्ही आवाजांमध्ये तफावत आढळली. त्यामुळे टोळीच्या नावाचा वापर करून अभिनेत्याला घाबरविण्याचा आणि खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाला असावा, असा तपास यंत्रणेला संशय आहे.
धमकी मिळाल्यानंतर तुषार कपूरने याबाबत मुंबई पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला. धमकीच्या दूरध्वनीचे ध्वनिमुद्रण तपासासाठी घेण्यात आले. तांत्रिक पथकाने त्यातील आवाजाची तुलना ‘हॅरी बॉक्सर’ याच्या उपलब्ध अधिकृत आवाजाच्या नमुन्यांशी केली. या प्राथमिक पडताळणीत दोन्ही आवाज जुळले नसल्याचे निष्पन्न झाले.
आवाजातील तफावतीमुळे धमकी देणारी व्यक्ती प्रत्यक्षात हॅरी बॉक्सर नसून, त्याचे नाव आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीची दहशत वापरून अभिनेत्याला धमकावणारी दुसरीच व्यक्ती असावी, असा पोलिसांचा संशय आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविणे, ध्वनिमुद्रणाचा स्रोत शोधणे आणि दूरध्वनी किंवा संदेश पाठविण्यासाठी वापरलेल्या माध्यमांचा माग काढणे, याबाबत तपास सुरू आहे. तुषार कपूरला धमकी मिळाल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली असली, तरी उपलब्ध माहितीनुसार या प्रकरणात अद्याप प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविण्यात आलेला नाही. त्यामुळे धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि या प्रकारामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.
दरम्यान, अभिनेता टायगर श्रॉफ याच्या जुहू येथील निवासस्थानाजवळ १८ ऑक्टोबरला गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींनी जबाबदारी स्वीकारली होती. या गोळीबाराचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू असतानाच तुषार कपूरला बिश्नोई टोळीच्या नावाने धमकी मिळाल्याने चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. तथापि, या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध असल्याचे अद्याप समोर आलेले नाही.
