अनेक हिंदी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री काम्या पंजाबी हिने आता राजकारणात प्रवेश केला आहे. शक्ती अस्तित्व के एहसास की या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या काम्या पंजाबी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप तसंच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रियंका गांधी आपल्या आदर्श असून त्यांच्यासारखं काम करायचं असल्याची इच्छाही काम्या पंजाबी यांनी व्यक्त केली.

काम्या पंजाबी यांच्यासोबत शांताराम नांदगावकर यांचे सुपुत्र प्रशांत शांताराम नांदगावकर यांनीही काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. या वेळेस काम्या पंजाबी म्हणाल्या की, “आमचे कुटुंब व मी लहानपणापासूनच काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे आहोत. काँग्रेस पक्षाची विचारधारा व त्यांची काम करण्याची पद्धत मला खूप आवडते. जेव्हा मी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना जनतेवर व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवताना मी पाहते, त्यावेळेस मला त्यांच्यासारखे काम करावेसे वाटते. मी प्रियांका गांधी यांना आपला आदर्श मानते. त्यांच्यासारखे काम करता यावे यासाठी आज मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे”.

काम्या पंजाबी या गेल्या दोन शतकांपासून हिंदी मालिका क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक प्रसिद्ध मालिका तसंच रिएलिटी शोजमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीसोबत बनू मैं तेरी दुल्हन, मर्यादा-लेकीन कब तक?, बेईंतहा अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. दीर्घकाळ चाललेल्या शक्ती-अस्तित्व के एहसास की या मालिकेतही त्या दिसल्या होत्या. तसंच बिग बॉग या रिएलिटी शे मध्येही त्यांनी सहभाग नोंदवला होता.