scorecardresearch

किरण माने प्रकरणाला नवे वळण; गैरवर्तनामुळे काढून टाकल्याचे निर्मात्यांचे स्पष्टीकरण

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेता किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी काढून टाकण्यात आले.

गैरवर्तनामुळे काढून टाकल्याचे निर्मात्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आमच्यावर आलेला नाही. अभिनेते किरण माने यांना त्यांच्या गैरवर्तनामुळे मालिकेतून काढण्यात आले,’ असे स्पष्टीकरण मालिकेच्या निर्मात्या सुझाना घई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले.

राजकीय दबावातून मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप माने यांनी केला होता. परंतु निर्मात्यांच्या स्पष्टीकरणामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेता किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी काढून टाकण्यात आले. ही कारवाई राजकीय दबावातून करण्यात आल्याचा आरोप माने

यांनी केल्यानंतर शुक्रवारी मोठा गदारोळ झाला. मी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे भाजपने वाहिनीवर दबाव आणल्याचा आरोप माने यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते.

या प्रकरणाला २४ तास उलटून गेले तरी वाहिनीने भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु निर्मात्यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केली. ‘माने यांचे वर्तन चांगले नव्हते. त्या संदर्भात त्यांना निर्माता संस्थेने दोन ते तीन वेळा सूचनाही केली होती. त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याने हा निर्णय  घ्यावा लागला’, अशी माहिती निर्मात्या सुजाना घई यांनी  दिली.

निर्मात्यांच्या स्पष्टीकरणावर किरण माने यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, की गैरवर्तनाचे कारण त्यांनी मला काढताना सांगायला हवे होते. काही  तास उलटल्याल्यानंतर अशा पद्धतीची प्रतिक्रिया निर्मात्यांनी  देणे गैर आहे. यामागे नक्कीच वेगळी पाश्र्वभूमी आहे. माझ्या  गैरवर्तनाची त्यांनी शहानिशा केली का? त्यासंदर्भात माझ्याशी स्पष्टपणे चर्चा केली का? त्या निर्मात्यांनी मला अजून पाहिलेलेच नाही. त्या कधाही सेटवर आलेल्या नाहीत. कोणतीही कल्पना न देता तडकाफडकी काढून टाकणे ही झुंडशाहीच आहे,’ असे माने म्हणाले.

अशीही चर्चा…

‘किरण माने यांचे मालिकेच्या सेटवरील वर्तन अनेकांना खटकणारे होते. अरेरावी, टिपण्या करणे याचा त्रास दिग्दर्शकासह सहकलाकारांनाही होत होता. माझ्यामुळे ही मालिका उभी आहे, असे वारंवार ऐकवले जायचे. यासंदर्भात निर्मात्यांनी त्यांना अनेकदा पूर्वसूचना दिली होती. परंतु वर्तनात सुधारणा होत नसल्याने हे घडले आहे. समाजमाध्यमांवरील वातावरण लक्षात घेऊन या प्रकरणाला जाणीवपूर्वक राजकीय वळण देण्यात आले आहे,’ अशी चर्चा सुरू आहे.

महिलेची तक्रार कोणती?

माने यांच्या संदर्भात एका महिलेने तक्रार केल्याचे बोलले जात आहे. परंतु तक्रार नेमकी कोणती याचे स्पष्टीकरण अद्याप झालेले नाही. ‘माझ्याकडून एखाद्या महिलेशी गैरवर्तन घडले असेल तर पोलिसांत तक्रार करणे गरजेचे होते, पण तसे झाले नाही. मी कधीही तसे वर्तन केले नाही. त्यामुळे तक्रार नेमकी कोणती याबाबत वाहिनीने स्पष्ट करावे,’ असेही माने म्हणाले.

पवार यांची भेट

किरण माने यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली. ‘माझ्यावर झालेल्या अन्यायाची सविस्तर माहिती मी पवारांना दिली. माझ्यावर होत असलेल्या आरोपांबाबतचे पुरावे त्यांच्यापुढे मांडले. मला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे,’ असे माने यांनी सांगितले.

किरण माने यांना मी वैयक्तिक ओळखत नाही पण राजकीय भूमिका घेतल्यामुळे हे घडणे शक्य नाही. मीही अनेकदा राजकीय भाष्य करतो. त्यावर टीका होतात, परंतु वाहिनीने आजतागायत कधीही हस्तक्षेप केला नाही. किरण यांनी भाजपचे समर्थक अर्वाच्य भाषेत बोलतात असा आरोप केला, परंतु राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचे कार्यकर्तेही माझ्याशी त्याच भाषेत बोलतात. त्यामुळे कोणत्याही पक्षाला दोषी धरू नये. वाहिन्या कधीही राजकीय दबावाला बळी पडत नाहीत. तसे असते तर आदेश बांदेकर, अमोल कोल्हे, शरद पोंक्षे, सुशांत शेलार ही मंडळी कामच करू शकली नसती. महत्वाचे म्हणजे समाज माध्यमांवर राजकीय मते मांडताना भाषेचा वापर जपून करणे अत्यंत गरजेचे आहे.               – आरोह वेलणकर, अभिनेता

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Twist to the kiran mane case manufacturers explanation of removal due to misconduct akp

ताज्या बातम्या