नोकरीचे आमिष दाखवून मुंबईतील दोन तरुणांचे म्यानमारमध्ये अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणांच्या कुटुंबियांनी ५ लाख रुपये अपहरणकर्त्यांना दिल्यानंतर अखेर त्यांची सुटक करण्यात आली. मात्र, त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतर अधिक मुक्काम केल्याबद्दल बँकॉक पोलिसांनी त्यांना दंडही केला आहे.

शेहजाद मोहम्मद तांबोळी ( वय २९ ) आणि सौद नियाजी ( वय २८ ) अशी अपहरण झालेल्या तरुणांची नावे आहेत. या तरुणांनी म्यानमारमधून परतल्यानंतर गुरुवारी डोंगरी पोलीस ठाण्यात ट्रॅव्हल एजंट आणि त्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी, शेहजाद आणि सौद यांना डोंगरी परिसरातील नवाज पठाण नावाच्या व्यक्तीने थायलंडमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी त्यांची निशानपाडा रोड येथील उमर चिरुवट्टमशी याने मुलाखत घेतली. त्यानंतर त्या दोघांना ही मुलाखत पास केली असून, २४ ऑगस्टला बँकॉकसाठी येण्यास एका चिनी व्यक्तीने दूरध्वनीवरुन सांगितलं.

त्यानुसार, शेहजाद आणि सौद दोघेही बँकॉकला गेले. मात्र, तिथे गेल्यावर त्यांना मोई नदी पार करुन एका केके एंटरप्रायझेस नावाच्या कंपनीत नेण्यात आलं. त्या कंपनीची संरक्षण भिंत काटेरी तारांनी संरक्षित करण्यात आली होती. मात्र, या दोघांनीही तिथे काम करण्यास नकार दिला. तेव्हा त्यांच्याकडे प्रत्येकी ५ लाखांची मागणी करण्यात आली. ही माहिती दोघांनी कुटुंबियांना दिली. त्यानुसार कुटुंबियांनी ते पैसै हस्तांतरित केले. त्यानंतर दोघांची सुटका झाली.

मात्र, दोघांच्या व्हिसाची मुदत संपली होती. त्यामुळे तेथील पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. अखेर तीन ते चार दिवसांनी बँकॉक विमानतळावर त्यांना सोडण्यात आलं. शेहजादने सांगितल्यानुसार, केके एंटप्रायजेस या कंपनीत २५०० हून अधिक भारतीय काम करतात. माझे नुकतेच लग्न झाल्याने पैशाच्या आमिषाने मी तिथे गेले होते. दरम्यान, अलिकडेच सरकारने ३२ भारतीयांची सुटका म्यानमारमधून केली आहे.