मुंबई : देशातील प्रमुख शहरांमधील घरविक्री मंदावली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात १४ टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबई महानगर परिसर तसेच पुण्यात घरविक्री अनुक्रमे १८ व २० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याचवेळी घरांच्या किमतीत आठ टक्के वाढ झाल्यामुळे घरविक्रीतून मिळालेल्या रकमेत मात्र सहा टक्के वाढ झाली आहे. मुंबईत अद्यापही पावणेदोन लाख घरे रिक्त आहेत. यामध्ये प्रामुख्याने दीड कोटींपेक्षा अधिक किमतीच्या घरांचा समावेश आहे.

‘ॲनारॅाक’ या सर्वेक्षण कंपनीने देशांतील सात शहरांतील घरविक्रीबाबत सादर केलेल्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. सात शहरात या वर्षांत तीन लाख ९५ हजार ६२५ घरांची विक्री झाली तर २०२४ अखेर चार लाख ५९ हजार ६४५ घरांची विक्री झाली होती. या आकडेवारीवरुन घरविक्रीत सुमारे १४ टक्के घट झाल्याचे दिसून येते. घरविक्रीतून गेल्या वर्षी पावणेसहा लाख कोटी रुपये मिळाले होते. यंदा मात्र त्यात वाढ होऊन सहा लाख कोटी मिळाले. ही वाढ आठ टक्के आहे. घरांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे घरविक्रीत घट झाली तरी महसूलात वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. घरांच्या वाढलेल्या किमती हे त्यामागे कारण असून त्यामुळेच घरविक्री घटली तरी महसूल मात्र वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई महानगरात यंदा एक लाख २७ हजार ८७५ घरे तर पुण्यात ६५ हजार १३५ घरे विकली गेली. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ अनुक्रमे १८ व २० टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे. यंदाही मुंबईत प्रामुख्याने पश्चिम उपनगरात घरांची जोरदार विक्री झाली. त्या तुलनेत यंदा पूर्व उपनगरात मंदीचे वातावरण होते. तयार घरांची संख्या काही प्रमाणात कमी होणे, हे एक कारण असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सात शहरात यंदा चार लाख १९ हजार १७० नव्या घरांची घोषणा झाली. हेच प्रमाण २०२४ मध्ये चार लाख १२ हजार ५२० होते. ही वाढ फक्त दोन टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नव्या घरांच्या निर्मितीत देशात मुंबई महानगर आघाडीवर असल्याचे आढळून आले. गेल्या वर्षाच्या तुलनेत ४८ टक्के नव्या घरांची घोषणा करण्यात आली आहे.

यंदा अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या घरांची घोषणा झाली असून ते प्रमाण २१ टक्के आहे. सातही शहरात एकूण चार लाखांपेक्षा अधिक घरांची विक्री झाली आहे, असे ॲनारॅाक समुहाचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले. महागड्या घरांना यंदा अधिक मागणी होती. विकासकांकडून वेळेत घरांची निर्मिती होत असल्यामुळे घर खरेदीदारांचा कल वाढल्याचेही त्यांनी सांगितले.