मुंबई : दुकानाची कागदोपत्री नोंद करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भाडे संकलकासह एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी अटक केली. आरोपींच्या कार्यालयाच्या झडतीत आणखी तीन लाख रुपये एसीबीच्या अधिकाऱ्यांना सापडले. तपासासाठी ही रक्कम जप्त करण्यात आली. एसीबीने या प्रकरणी भाडे संकलक राजेंद्र नाईक (५४) व कर्मचारी मोहन ठिक (५४) या दोघांना अटक केली.
याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या राहत्या घरास लागूनच पुढील बाजूस त्यांचे दुकान आहे. त्यांचे घर पत्नीच्या नावावर असून दुकान तक्रारदारांच्या नावावर आहे. तक्रारदारांनी १९८५ मध्ये ‘झोपु’ प्राधिकरणाकडे शुल्क भरून व्यावसायिक गाळा म्हणून ते स्वत:च्या नावे करून घेतले होते. त्यानंतर तक्रारदारांनी २०२० मध्ये पालिकेमधून पात्रता यादी मिळवली, त्यामध्ये तक्रारदारांना त्यांच्या दुकानाची नोंद आढळली नाही. तसेच तक्रारदारांच्या पत्नीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या सागबाग स्नेहनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचे परिशिष्ट २ मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी पालिकेच्या के पूर्व विभागातील प्रकल्प अधिकारी (वसाहत) यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जाच्या सुनावणीअंती तक्रारदारांच्या पत्नीचे अपील अमान्य करण्यात आले होते. तसेच तक्रारदारांनी दुकानासंदर्भात झोपु योजनेत व्यावसायिक दुकानाची नोंद पूर्ववत करण्याकरिता दुकानाची कागदपत्रे जोडून जानेवारी २०२२ मध्ये अंधेरी येथील पालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयात अर्ज केला होता. त्या वेळी भाडे संकलक राजेंद्र नाईक यांनी तक्रारदारांना पत्नीच्या घरासंदर्भातील अपिलाबाबत आदेश बदलून देण्याकरिता व तक्रारदारांच्या नावे असलेल्या दुकानाची नोंद व्यावसायिक मालमत्ता म्हणून पूर्ववत करण्याकरिता त्यांच्याकडे तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केली. २१ फेब्रुवारीला केलेल्या पडताळणीत नाईक यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी एसीबीने सापळा रचून भाडे संकलक राजेंद्र नाईक व कर्मचारी मोहन ठिक यांना रंगेहाथ पकडले.