scorecardresearch

मुंबई: मद्यप्राशन करून विमानात गोंधळ घालणारे दोघे अटकेत

दुबई येथून मुंबईला येताना मद्यप्रशान करून विमानात गोंधळ घातल्याप्रकरणी दोन प्रवाशांना मुंबईतील सहार पोलिसांनी अटक केली.

arrest
प्रातिनिधिक फोटो ( Image – लोकसत्ता टीम )

दुबई येथून मुंबईला येताना मद्यप्रशान करून विमानात गोंधळ घातल्याप्रकरणी दोन प्रवाशांना मुंबईतील सहार पोलिसांनी अटक केली. इंडिगो विमान कंपनीने केलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी प्रवासी दत्तात्रेय बापर्डेकर (४९) आणि जॉन जॉर्ज डिसोझा (४७) या दोघांना अटक करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. अटक केल्यानंतर या दोघांनाही जामिनावर सोडण्यात आले.

हेही वाचा >>>“एकीकडे पत्रकार परिषद अन् दुसरीकडे बायकोला कुत्रा चावला, मग…”; राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी पहाटे ५ वाजता उड्डाण केलेल्या इंडिगोच्या विमानाने दत्तात्रेय आणि जॉन मुंबईत येत होते. स्वतः सोबत आणलेले मद्य विमानात पिण्यास आणि धूम्रपान करण्यास मनाई आहे. पण आसन क्रमांक ‘१८-ई’ व ‘२०-बी’वरील प्रवासी मध्यपान करीत असल्याचे सहप्रवाशांच्या लक्षात आले. त्यांच्या शेजारी बसलेल्या सहप्रवाशांनी त्याबाबत आक्षेप घेतला. या प्रवाशांकडे गुटख्याच्या पुड्याही होत्या. विमान कर्मचाऱ्यांनी या दोन्ही प्रवाशांना ताकीद दिली असता ते आसनावरून उठले आणि मोकळ्या जागेत फिरू लागले. तसेच जोरजोरात शिवगाळ करू लागले. याबाबत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, ही बाब कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र दोन्ही प्रवासी गोंधळ घालतच होते.

हेही वाचा >>>मुंबई: दुकानदाराच्या हत्ये प्रकरणी दिल्लीत दोघांची धरपकड

वैमानिकानेही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या गोंधळाचा त्रास होत असल्यामुळे सहप्रवासी विमानातील कर्मचाऱ्यांकडे वारंवार तक्रार करीत होते. या दोघांना शांत राहण्याची सूचना करण्यात आली. अखेर मुंबई विमानतळावर विमान उतरल्यानंतर या दोन्ही प्रवाशांना सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्यांना सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आणि त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली. दोघांविरूद्ध भादंवि च्या कलम ३३६ आणि विमान नियमांच्या कलम २१,२२ आणि २५ अंतर्गत मद्यधुंद अवस्थेत आणि विमान कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांनाही रीतसर अटक करण्यात आली, पण कलमे जामीनपात्र असल्याने त्यांना पोलीस ठाण्यातूनच जामीन मंजूर करण्यात आला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या