मुंबई : मैत्रीणीच्या वाढदिवसासाठी गेलेल्या १४ वर्षांच्या मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना मालवणी येथे घडली. या मुलीची अश्लील चित्रफित तिच्या आईला पाठविण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
पीडित मुलगी १४ वर्षांची आहे. फेब्रुवारी महिन्यात तिला वर्गमैत्रिणीने वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले होते. त्यासाठी पीडित मुलगी तिच्या घरी गेली होती. परंतु तिथे अन्य कुणी नव्हते. तिची मैत्रीण काही कामानिमित्ताने घराबाहेर गेली आणि २३ वर्षांचा एका तरुण घरी आला. त्याने वाढदिवसाच्या पार्टीला आल्याचे सांगितले. त्यानंतर घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याने या प्रकाराचे आपल्या मोबाइलमध्ये चित्रण केले होते.
नंतर त्याने ही चित्रफित आपल्या अन्य एका मित्राला पाठवली. त्या दुसर्या आरोपीने या चित्रफितीच्या आधारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली. जर माझ्याशी शरीरसंबंध ठेवले नाही तर ही अश्लील चित्रफित वायरल करण्याची धमकी त्याने दिली. त्यामुळे एप्रिल महिन्यात पीडित मुलगी त्याला भेटायला गेली. त्याने पीडितेला गोराई येथील एका लॉज मध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार इथेच थांबला असे पीडितेला वाटले होते. मात्र दिड महिन्याच्या काळात दोन्ही आऱोपी तिला वारंवार धमकावून तिच्यावर बलात्कार करत होते.
मात्र ६ जून रोजी पीडितेची ती अश्लील चित्रफित तिच्या आईला पाठविण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (१), ५६ (१), तसेच ३ (५) अंतर्गत बलात्काराचा, तसेच अश्लील चित्रफित वायरल केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून या दोन्ही आरोपींना अटक केली. त्यापैकी एक आरोपी २३ वर्षांचा असून तो ओला चालक आहे. दुसरा आरोपी याच परिसरात पाळीव कुत्रा सांभाळण्याचे काम करतो.
सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरू आहे. आम्ही आरोपींचे मोबाइल जप्त केले असून तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, असे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले. ज्या मैत्रीणीच्या घरी वाढदिवसाची पार्टी झाली, तिचा या प्रकरणात सहभाग आहे का त्याचाही तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.