मुंबई : आतापर्यंत दीडशे कोटीपेक्षा अधिक किमतीच्या सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीच्या प्रमुख सदस्यासह दोघांना अटक करण्यात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) मंगळवारी यश आले. अटक आरोपींमध्ये एका कंपनीच्या संचालकाचाही समावेश आहे. यंत्रांमध्ये सोन्याचे सुटे भाग बसवून ही टोळी परदेशातून सोन्याची तस्करी करत होती. डीआरआयने या प्रकरणी एअर कार्गो संकुलातून १६ किलो सोने हस्तगत केले असून त्याची किंमत साडेसात कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

 हाँगकाँगवरून यंत्रांमधून सोने लपवून भारतात आणले जात असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार मुंबईतील एअर कार्गो संकुलात शोधमोहीम राबवून डीआरआयने १६ किलो ५४ ग्रॅम सोने ताब्यात घेतले. तीस इलेक्ट्रिक ब्रेकर यंत्रांमध्ये सोन्याचे अंडाकृती भाग लपवण्यात आले होते. जप्त करण्यात आलेले सोने २१ कॅरेट असून त्याची किंमत सात कोटी ३९ लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  हाँगकाँगमधून १२ मे रोजी हे सोने मुंबईत पाठवण्यात आले असून ते १७ मे रोजी मुंबईत आले. ते सोने स्वीकारण्यासाठी आलेल्या प्रवीण नावाच्या व्यक्तीला मंगळवारी डीआरआयने अटक केली. तो हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी असून आयात करणारी कंपनी वॉकिंग टर्टल सव्‍‌र्हिसेस प्रा.लि. याचा संचालक आहे. प्रवीणच्या चौकशीत तो सोने तस्करी करणाऱ्या सराईत टोळीचा सदस्य असल्याचे मान्य केले असून त्याने आतापर्यंत २० वेळा सोन्याची तस्करी केल्याचे मान्य केले. त्याच्या चौकशीत या टोळीचा प्रमुख सदस्य असलेल्या कमलची माहिती डीआरआयला मिळाली. त्यालाही या प्रकरणी अटक करण्यात आली. कमल हा दिल्लीचा रहिवासी असून अनेक कंपन्यांच्या माध्यमातून तो सोन्याची तस्करी करत होता. प्रवीणची कंपनीही कमलच्या नियंत्रणाखाली काम करत होती. या टोळीने आतापर्यंत १५० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या सोन्याची तस्करी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीचे सदस्य परदेशातही असल्याची माहिती मिळाली आहे.