दोन चिनी हिरेचोरांना अटक

३४ लाख रुपये किमतीचा हिरा हस्तगत

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

३४ लाख रुपये किमतीचा हिरा हस्तगत

गोरेगावच्या नेस्को मैदानात भरलेल्या आंतरराष्ट्रीय हिरे प्रदर्शनातून लाखो रुपये किमतीचा एक हिरा चोरून पसार झालेल्या दोन चिनी नागरिकांना वनराई पोलिसांनी विमानतळावरून अटक केली. चियांग चांग क्विंग आणि डेंग झियाबो अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्या सामानातील शॅम्पूच्या बाटलीतून चोरलेला ५.४३ कॅरेटचा, ३४ लाख रुपये किमतीचा हिरा हस्तगत करण्यात आला.

पोलीस उपायुक्त विनय कुमार राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार २७ ते ३१ जुलै दरम्यान इंडिया इंटरनॅशनल जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी असोसिएशनने हे प्रदर्शन भरवले होते. प्रदर्शनात देशाबाहेरूनही सराफा व्यावसायिक हिरे, हिरेजडित दागिने घेऊन सहभागी झाले होते. या प्रदर्शनाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या सशस्त्र जवानांचा बंदोबस्त होता. तसेच प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वसामान्यांना प्रवेश नव्हता. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी, शुल्क भरणे आवश्यक होते.

हे दोन्ही चिनी नागरिक ३० जुलैच्या मध्यरात्री मुंबईत आले. रविवारी सकाळी ते प्रदर्शनात आले. एका स्टॉलवर ते बराच वेळ रेंगाळले. त्यांनी हिरे पाहिले आणि नंतर ते ठेवून निघून गेले. संध्याकाळी आवराआवर करताना एक हिरा बोगस असल्याचे स्टॉलवरील कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्याने तात्काळ आपल्या वरिष्ठांना कळवले. प्रकरण वनराई पोलीस ठाण्याकडे तपासासाठी आले. वरिष्ठ निरीक्षक ज्योत्स्ना रासम, निरीक्षक महादेव निंबाळकर आणि पथकाने तातडीने स्टॉलवर आलेल्यांना सीसीटीव्ही चित्रणाद्वारे पाहिले. त्यात या दोन चिनी नागरिकांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. रासम यांनी ही बाब उपायुक्त राठोड यांना कळवली. राठोड यांनी विशेष शाखेसह विमानतळावरील ‘सीआयएसएफ’च्या वरिष्ठांना संशयित चिनी नागरिकांबद्दल माहिती कळवली. त्यानुसार दोघे संध्याकाळी पाचच्या सुमारास विमानतळावर आढळले. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दुभाषाच्या मदतीने चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडील शॅम्पूच्या एका छोटय़ाशा बाटलीत चोरलेला हिरा सापडला. तसेच दोन ते तीन खोटे हिरेही सापडले. या दोघांनी हातसफाईने स्टॉलवरील खरा हिरा घेतला आणि जवळचा खोटा तेथे ठेवून काढता पाय घेतला, ते चोरीच्याच उद्देशाने मुंबईत आले होते, असे चौकशीतून समोर आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Two chinese nationals arrested for diamond theft