मुंबई : केंद्रीय अन्वेष विभागाने (सीबीआय) दोन वेगवेगळय़ा प्रकरणांच्या तपासादरम्यान सीमाशुल्क विभागाच्या यापूर्वी तैनात असलेल्या दोन उपायुक्तांना अटक केली. याप्रकरणी सीबीआयने मुंबई, नवी मुंबईसह सात ठिकाणी शोध मोहीम राबवली असून दोन्ही आरोपींना न्यायालयापुढे हजर केले. त्यांना ९ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआयने यूबी सेंटर, जेएनसीएच, मुंबई येथे नियुक्त तत्कालीन सीमाशुल्क उपायुक्त दिनेश फुलदिया आणि सुभाष चंद्रा यांच्यासह खासगी व्यक्ती, दलाल अशा सहा जणांविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले होते. परदेशात दोन वर्षांपेक्षा अधिक काळ राहिलेल्या व्यक्तींच्या पारपत्राचा वापर आयातीसाठी करत असल्याचा आरोप आहे. विशेषत: आखाती देशांमध्ये घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अन्य वस्तूंसह विविध वस्तू आयात करण्यासाठी प्रथमत: वस्तूंचे मूल्य कमी दाखवले, तसेच वस्तू लपवून ठेवल्या. त्या वस्तू परदेशात स्थायिक झालेल्या आणि परदेशात राहणाऱ्या इतर अनेक व्यक्तींसाठी आयात केल्या, असे दाखवल्याचा आरोप आहे. त्याद्वारे आरोपी अधिकाऱ्यांना दलाल व खासगी व्यक्तींकडून लाच मिळत असल्याचा आरोप आहे. ती रक्कम बँक व हवाला मार्गाने वेगवेगळय़ा खात्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या परिचीत व्यक्तीला पाठवली जायची. याप्रकरणी मुंबई, नवी मुंबई, पाटणा आणि समस्तीपूर (बिहार), खरगोन जिल्हा (मध्य प्रदेश) आदींसह सात ठिकाणी आरोपी आणि त्यांच्या साथीदारांच्या घरावर छापे टाकण्यात आले. त्यात गुन्ह्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यता आली आहेत.