पुणे/ मुंबई : पोषक वातावरणामुळे राज्यात पुढील दोन दिवस सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्याच्या काही भागांत १३ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, कोकण आणि पश्चिाम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत रविवारी पावसाने हजेरी लावली.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे गुजरातच्या परिसरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मोसमी पावसाची आस असलेला हा पट्टा गुजरातपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार आहे. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १३ सप्टेंबरला राज्याच्या सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.

रविवारी कोकण विभागात अनेक ठिकाणी पाऊस झाला, मुंबई, रत्नागिरीतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक भागांत पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद, विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आदी भागांत हलका पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांत माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणी आदी घाटमाथ्यावरील भागांमध्ये १०० ते १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकण विभागात आणखी तीन, तर मध्य महाराष्ट्रात दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात  दोन दिवस अनेक ठिकाणी पाऊस असेल.

पश्चिाम किनारपट्टीवर पुढील ३ ते ४ दिवस जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह कोकणात मुसळधार ते अति मुसळदार पाऊस पडेल. सोमवारी पालघर, ठाणे, रत्नागिरी येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. रायगड येथे तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची तर मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे २७८९.८ मिमी आणि कु लाबा येथे २१४९.५ मिमी एकू ण पावसाची नोंद झाली.

पाऊसभान…

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १४ ते १५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील घाट विभागांत १४ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. १३ सप्टेंबरला जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. या दिवशी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.